Breaking News

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-यास सात वर्षे सक्तमजुरी


सातारा,अल्पवयीन मुलीवर दोन वेळा बलात्कार केल्यानंतर त्या मुलीला लग्न करतो, असे सांगून फसवणूक करणा-या प्रशांत एकनाथ घोरपडे (वय 31) याला 7 वर्षांच्या सक्त मजुरीची आणि त्या मुलीचा गर्भपात केल्याच्या प्रकरणात आरोपीची आई शोभा एकनाथ घोरपडे (वय 52, दोघे रा. पिराचीवाडी) हिला 3 वर्षांच्या साध्या कैदेची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 7 पी. व्ही. घुले यांनी ठोठावली. त्याशिवाय न्यायालयाने पीडितेला 5 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचेही आदेश दिले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, 19 व 25 जून 2011 रोजी प्रशांत घोरपडे याने अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने बलात्कार केला होता. बलात्काराची माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती. त्यामुळे अल्पवयीन कमालीची घाबरलेली होती. या प्रकारानंतर सुमारे पाच महिन्यानंतर अत्याचार झालेली मुलगी गर्भवती असल्याचे लक्षात आले. त्यातच पीडित मुलीचे कुटुंबीय सर्वसामान्य होते. मुलीचे आई, वडील रोजगारीने काम करत आहेत. कुटुंबीयांनी मुलीला विश्‍वासात घेवून त्याबाबत चौकशी केल्यानंतर प्रशांतचे नाव तिने सांगितले. पीडित कुटुंबीयांनी मुलासह त्याच्या कुटुंबाला जाब विचारल्यानंतर प्रशांतनेही गैरकृत्य केल्याची कबुली दिली. दोन्ही कुटुंबाची बैठक झाल्यानंतर प्रशांतने त्या मुलीशी लग्न करतो, आता गर्भपात करा, असे लेखी लिहून दिले. गर्भवती मुलीचा गर्भपात करण्यासाठी शोभा घोरपडे यांनी तगादा लावल्याने व नंतर लग्न करतो, असे लिहून दिल्याने त्या मुलीचा गर्भपात करण्यात आला. काही महिने गेल्यानंतर मुलगी सज्ञान झाल्यानंतर लग्नाबाबत विचारले असता मुलाने विवाहासाठी नकार दिला. अखेर त्या पीडित कुटुंबीयांनी वाई पोलीस ठाण्यात 23 डिसेंबर 2011 रोजी तक्रार दिली. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सपोनि श्रीकांत डोंगरे-पाटील यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

जिल्हा न्यायालयात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. मंजूषा तळवलकर यांनी युक्तिवाद केला. सुरुवातीला हे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायाधीश 2 वर्षा मोहिते यांच्याकडे होते. मात्र त्यांची बदली झाल्याने पुढे हे प्रकरण न्या. पी. व्ही. घुले यांच्यासमोर आले. बचाव व सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीशांनी आई व मुलाला शिक्षा सुनावली. दरम्यान, न्यायालयाने शिक्षा दिल्यानंतर पीडित कुटुंबाने न्यायव्यवस्था, पोलीस, वकील या सर्वांचे आभार मानले आहेत.