Breaking News

शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन माहिती द्या : आ. थोरात


चुकीचे बियाणे व औषधे यांच्या वापरामुळे महाराष्ट्रात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. मात्र शेजारील कोणत्याही राज्यात हा प्रार्दूभाव झाला नाही. किटकनाशकांबाबत सुरक्षितता, जास्त उत्पादन व शासकीय योजनांची माहिती कृषी विभागाने शेतकर्‍यांच्या बांधावर जावून द्यावी, असे प्रतिपादन माजी कृषीमंत्री काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी केले.
प्रांताधिकारी कार्यालयातील सभागृहात कृषी विभागाच्यावतीने आयोजित खरीप आढावा पूर्व नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, जि. प. कृषी संवर्धन सभापती अजय फटांगरे, सभापती निशा कोकणे, इंद्रजित थोरात, उपसभापती नवनाथ अरगडे, जि. प. सदस्य भाऊसाहेब कुटे, रामहारी कातोरे, शांता खैरे, मिरा शेटे, शिवाजी थोरात, केशवराव मुर्तडक, विष्णुपंत रहाटळ, उपविभागीय अधिकारी भागवत डोईफोडे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब मुसमाडे, कृषी अधिकारी कारभारी नवले, तहसीलदार साहेबराव सोनवणे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे आदी उपस्थित होते.

आ. थोरात म्हणाले, बनावट बियाणे व किटकनाशके यामुळे राज्यात बोंडअळीचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शेजारी गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यात हा प्रादूर्भाव नव्हता. खरे तर कृषी विभाग व विद्यापीठे स्तब्ध झाली आहे. शासनाच्या विविध योजना समजावून सांगण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी त्यांच्या शेतावर जा. घोंगडी बैठका घ्या. शिवार फेर्‍या करा. त्यांना जास्तीत जास्त माहिती द्या. आगामी काळात शेतकर्‍यांना वेळेत बी - बियाणे, खते मिळतील, यासाठी नियोजन करा. खरेतर राज्यपातळीवर पुन्हा खरीप आढावा बैठका सुरु झाल्या पाहिजे. यामुळे सरकारला शेतकर्‍यांच्या अडचणी कळतील. पीकविमा शेतकर्‍यांच्या मोठ्या मदतीचा असून त्याबाबत जास्तीत जास्त जागृती करा, कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांनी विविध सांकेतिकस्थळांवरुन पावसांचे अंदाज घेवून शेतकर्‍यांना कळवावेत. जलयुक्त शिवार योजनेच्या मोठ्या गाजा वाजाबद्दल नाराजी व्यक्त करीत शेततळी, कांदा चाळ, कृषी औषधे याबाबत सूचनाही त्यांनी केल्या.

आ. डॉ. तांबे म्हणाले, किटकनाशकांमुळे शेतकर्‍यांचा मृत्यू होणे, हे अत्यंत दुर्देवी आहे. विषारी औषधे वापरण्याची पद्धती याबाबतच्या उपाययोजना याची अधिक माहिती कृषी विभागाने शेतकर्‍यांपर्यत पोहचविली पाहिजे. यासाठी कृषी कर्मचार्‍यांनी अधिक माहिती घेवून शेतकर्‍यांना प्रात्याक्षिकांसह माहिती द्यावे.

यावेळी जि. प. कृषीसमितीचे सभापती अजय फटांगरे यांनी जि. प.च्या माध्यमातून शेतकर्‍यांसाठी सुरु असलेल्या विविध शासकीय योजनांसाठी जास्तीतजास्त निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करु, असे सांगितले. यावेळी कृषी अधिकारी कारभारी नवले यांनी कृषी विभागाच्या विविध योजना तसेच खते, बी बियाणे याबाबतची सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी सुनंदा भागवत, प्रियंका गडगे, बेबी थोरात, मिना इल्हे, बापूसाहेब गिरी, केशवराव मुर्तडक, विवेक कासार, वनविभागाचे प्रकाश सुतार, निलेश आखाडे, महावितरणचे पानसरे आदी उपस्थित होते.

प्रारंभी उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब मुसमाडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. यावेळी तालुक्यातील नागरिक, पदाधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, खते व बी - बियाणे विक्रेते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशोक कुटे यांनी आभार मानले.