Breaking News

वृक्षसंवर्धनासाठी गिरींचा आदर्श घ्यावा : आ. डॉ. तांबे


‘स्वच्छ सुंदर व हरित संगमनेर’साठी नगरपालिकेचे उत्कृष्ट काम सुरु आहे. येथील बापूसाहेब गिरी यांनी वृक्षप्रेमातून भेट दिलेल्या १० ट्रीगार्डचा आदर्श इतरांसाठी स्फूर्तिदायक ठरेल. त्यामुळे त्यांच्या या या कार्याचा आदर्श इतरांनी घ्यावा, असे आवाहन दंडकारण्य अभियानाचे मुख्य प्रवर्तक आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
जिल्हा बँक कार्यालयासमोर अमृतवाहिनी बँकेचे संचालक बापूसाहेब गिरी यांनी नगरपालिकेला १० ट्रीगार्ड भेट दिले. यावेळी ते बोलत होते. नगराध्यक्षा दुर्गा तांबे, शिवाजी थोरात, चंद्रकांत कडलग, रजिस्ट्रार बाबूराव गवांदे, संपत दिघे, प्राचार्य बी. के. शिंदे, बाळासाहेब चौधरी, प्रकाश कडलग, मोहन पवार, बाळासाहेब भंवर, लक्ष्मण कर्पे, अशोक थोरात, अनिल नवले आदी उपस्थित होते.

आ. डॉ. तांबे म्हणाले, नगरपालिकेने रस्त्याच्या दुतर्फा मोकळया जागेत वृक्षारोप केले आहे. मात्र ही वृक्षसंवर्धनाची जबाबदारी नागरिकांची आहे. प्रत्येक संगमनेरकरांनी वृक्ष संस्कृती सांभाळणे हे आपले पहिले कर्तव्य मानले पाहिजे. या वृक्षांच्या रक्षणासाठी अनेकांनी सहकार्य केले आहे. यामध्ये सेवाभावी संस्थांसह अनेक नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. बापूसाहेब गिरी यांनी दहा ट्रीगार्ड देवून वृक्षांप्रती आपली निष्ठा जपली आहे. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत नगरपालिका देश पातळीवर पहिल्या सात क्रमांकात येणे, ही अभिमानाची बाब आहे.

नगराध्यक्षा तांबे म्हणाल्या, आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर व तालुका विकासातून सर्वच क्षेत्रात अग्रगण्य आहे. लावलेली झाडे प्रत्येकाने जपली पाहिजे. हिरवाई हे मोठे सुख समाधान असून ती फुलविण्यासाठी महिला भगिनींनी विशेष पुढाकार घ्यावा. आपल्या परसबागेत वृक्षारोपण करा व ते जपा. तसेच समाजातील अनेक नागरिकांनी वृक्षसंवर्धन चळवळीत सक्रीय सहभाग घ्यावा. यावेळी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. तालुका विकास अधिकारी बापूसाहेब गिरी यांनी आभार मानले.