Breaking News

लोकसभा-विधानसभा पोटनिवडणूकांचा कार्यक्रम घोषित

मुंबई : पालघर आणि भंडारा- गोंदिया या लोकसभा आणि पलुस- कडेगाव या विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकांचा कार्यक्रम गुरूवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, या ठिकाणी 28 मे 2018 रोजी मतदान घेण्यात येणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरूवारी पालघर आणि भंडारा- गोंदिया या लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकांचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार या दोन्ही ठिकाणच्या पोटनिवडणूकीसाठी येत्या 28 मे 2018 रोजी मतदान घेण्यात येणार आहे तर मतमोजणी 31 मे रोजी होईल. भाजपावर नाराज असलेले भंडारा- गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने या ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे तर पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. पलुस- कडेगाव मतदार संघाचे कॅांग्रेसचे आमदार पतंगराव कदम यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या एका जागेसाठी येत्या 28 मे रोजी पोटनिवडणूक होणार आहे. राज्यातील दोन लोकसभा आणि एका विधानसभा पोटनिवडणूकीसाठी येत्या 3 मे रोजी अधिसूचना जारी करण्यात येईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 10 मे ही शेवटची तारीख असून, 14 मे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.