Breaking News

दखल - महामेळाव्यातही गटबाजीचं प्रदर्शन

देशाच्या 68 टक्के भागावर भाजपचं वर्चस्व आहे. काँगे्रसमुक्त भारत करण्याचं स्वप्न घेऊन भाजप वाटचाल करतो आहे; परंतु भाजपची वाटचाल आता काँग्रेसमुक्तीवर थांबणारी नाही. प्रादेशिक पक्षांचा गळा घोटायला भाजप निघाला आहे. याची जाणीव शिवसेना, तेलुगु देसम यांसारख्या पक्षांना झाली आहे. त्यामुळं एकीकडं चंद्राबाबू नायडू यांनी भाजपचा देशात पराभव करायला हवा, अशी भाषा वापरली असताना मुंबईत भाजप मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकत होता. 

प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी मेळावे, सभाही घेण्याचा अधिकार आहे; परंतु त्यासाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर टाळायला हवा तसंच आपल्यामुळं सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी. भाजपच्या मेळाव्याला जाताना सत्ताधारी पक्षाच्या नेत्या, कार्यकर्त्यांनी ती शिस्त पाळली  नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी खास रेल्वेंची व्यवस्था करण्यात आली. त्याचे पैसे भरून घेतले की नाहीत, याचा अद्याप तपास नाही. रेल्वे व भाजपच्या कार्यकर्त्यांत समन्वय नसल्यानं अजनी ते मुंबई ही खास रेल्वे फक्त 17 कार्यकर्ते घेऊन मुंबर्ईला रवाना झाली. कार्यकर्त्यांना पाच-सहा तास रेल्वे स्थानकावर थांबावं लागलं. त्यामुळं सामान्य प्रवाशांचं दु:ख तरी त्यांना यानिमित्तानं कळलं असेल, तर ते अहो भाग्यम म्हणायचं. एकीकडं भाजपच्या कार्यकर्त्यांसाठीच्या खास वाहनांचे टोल घेतला गेला नाही, अशाही तक्रारी आल्या. एरव्ही खासगी टोलधाडांची पाठराखण करणार्‍या सरकारी पक्षासाठी मात्र टोलनाक्यांवर अडवणुकीची व्यवस्थाच नव्हती. सामान्य वाहन चालकांशी अरेरावीनं वागणार्‍या टोलधाडांना माणुसकी आली असेल, तर ती चांगलीच गोष्ट म्हणावी लागेल. 
शिवसेनेचा दसरा मेळावा, मनसेचा गुढीपाडवा मेळावा आणि आता भाजपचा महामेळावा व्हायला लागला आहे. शिवसेना व मनसेच्या मेळाव्यामुळं सामान्य मुंबईकरांची गैरसोय झाल्याच्या बातम्या नव्हत्या. त्याचं कारण हे मेळावे सुटीच्या दिवशी घेण्यात आले होते. भाजपनं मात्र कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी मेळावा घेतल्यानं सामान्य मुंबईक रांना हालांना सामोरं जावं लागलं. मेळाव्याच्या अगोदरच्या दिवशी भाजपच्या मेळाव्यासंबंधीच्या फलकांवर अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, एकनाथ खडसे यांच्यासारख्या नेत्यांची छायाचित्रं नसल्याचं निदर्शनास आणून देण्यात आलं, तेव्हा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्याकडं फारशा गांभीर्यानं पाहिलं नाही. भाजपच्या खासदारांची संख्या दोनपासून 282 पर्यंत एकाएकी झाली नाही. त्यामागं अखंड परिश्रम कारणीभूत आहेत. नरेंद्र मोदी यांच्या सहा महिन्यांच्या परिश्रमानं भाजपची सदस्यसंख्या एवढी झाली असं कुणी म्हणत असेल, तर ते स्वत: चीच फसवणूक करून घेत आहेत. भाजप वाढविण्यातलं वाजपेयी, अडवाणी, गोपीनाथ मुंडे, खडसे यांचं योगदान कुणी नाकारू शकत नाही. फ लकांवर त्यांची छायाचित्रं नसणं हे कूपमंडूक प्रवृत्तीचं लक्षण आहे. एकवेळ खडसे यांचं छायाचित्र नसलं, तरी समजू शकतं; परंतु वाजपेयी, अडवाणी, मुंडे यांना कसं टाळता येईल? भाजपनं मोठा गाजावाजा करत आपल्या 38 व्या स्थापना दिनानिमित्तानं मुंबईतील एमएमआरडीएच्या मैदानात भव्य मेळावा घेतला. त्यासाठी राज्यभरातून लाखो कार्यकर्ते मुंबईत आले; मात्र कार्यकर्त्यांनी कार्यक्रम ठिकाणी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचं साधं पोस्टर तसेच फोटो नसल्यानं नाराजी व्यक्त केली. ती स्वाभावीक आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी भाजप नेत्यांची तारांबळ उडाली.
भाजपच्या या कार्यक्रमातील एकाही पोस्टरवर गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नाही. आमच्या साहेबांचा कसा विसर पडला, असे सवाल उपस्थित करत बीडचे मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक झाले. कार्यक्रम सभास्थळी काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. आमच्या नेत्याचा फोटो किंवा पोस्टर लावा, अशा घोषणा दिल्या. दरम्यान, सभा ठिकाणी गोंधळ झाल्याची माहिती मिळताच गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे तात्काळ पुढे सरसावल्या. त्यांनी नाराज कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पदाधिकार्‍यांनी कार्यकर्ते आक्रमक होत असल्याचं लक्षात आणून दिल्यानंतर मुंडे भगिनींनी मंचावरून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. मेळाव्यासाठी देशभरातून येणार्‍या भाजपच्या कार्यकर्त्यांमुळं गुरुवारपासून महामार्ग जॅम झाले आहेत. अशातच भाजप कार्यकर्त्यांसाठी वांद्रे रेल्वे स्थानक ांपासून बेस्ट बसेस सोडण्यात आल्या आहेत; मात्र त्यामुळे कामावर जाणार्‍या मुंबईकरांना अर्धा-पाऊण तास बस नव्हत्या. त्यामुळं मुंबईकर चिडले आणि त्यांनी भाजप कार्यक र्त्यांना घेऊन जाणार्‍या बस रोखल्या. शुक्रवारी सकाळी नेहमीपˆमाणं बीकेसीच्या दिशेनं कामावर निघालेल्या मुंबईकरांना ट्रफिक जॅमचा त्रास सहन करावा लागला. भाजप कार्यक र्त्यांसाठी बेस्ट बस सोडल्यानं अन्य प्रवासी आणि कामावर निघालेल्या मुंबईकरांना मात्र अर्धा-पाऊण तास बसची वाट पाहावी लागली. त्यामुळं वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी वाढली. अखेर प्रवाशांनी आंदोलन सुरू केलं आणि भाजप कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवल्या; मात्र पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून गाड्या अडवणार्‍या मुंबईकरांना ताब्यात घेतलं. भाजपच्या कार्यक्रमासाठी आमचा खोळंबा का, असा संतप्त सवाल केला जात होता.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या बाईक रॅलीमध्ये वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठा ट्रॅफिक जमा झाला. बाईक रॅलीमुळे हायवेवरील दक्षिणेकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती, तर उत्तरेकडं जाणारी वाहतूकही संध गतीनं सुरू होती. ट्रॅफिक जाममुळं मुंबईकरांना घरी पोहोचण्यास उशीर होत होता. काही प्रवाशी याचा विरोध करण्यासाठी कार आहे, त्याच जागी सोडून रस्त्यावर उतरले होते. भाजपच्या बाईक रॅलीमुळे मुंबईकरांना नाहकचा त्रास सहन करावा लागला. या रॅलीचा फटका अनेक प्रवाशांना आणि पर्यटकांनाही बसला. विमानतळाकडे जाणार्‍या मार्गातच वाहतूक विस्कळीत झाल्यानं पर्यटकांना विमानही वेळेत पकडता आलं नाही. अमित शहा यांच्या बाईक र ॅलीमुळे झालेल्या ट्रॅफिक जामचा फटका बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनाही बसला. फिल्मसिटीवरून घरी येण्यासाठीचा रस्ता फक्त 30 मिनिटांचा आहे; मात्र आज या प्रवासाला त्यांना पाच तास लागले. या सर्व प्रकारांवरून भाजपच्या मतांत मेळाव्यामुळं वाढ होण्याऐवजी घट झाली, तर आश्‍चर्य वाटायला नको.