Breaking News

विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करणारा गुरुकूल उपक्रम बंद करण्यासाठी निवेदन


रयत शिक्षण संस्था, सातारा यांनी त्यांच्या माध्यमिक सरकारी शाळांमध्ये सहशालेय गुरुकुल उपक्रम राबविला आहे. परंतू सदरचा उपक्रम राबवीत असताना बालकांमध्ये आर्थिक व शैक्षणिक भेदभाव निर्माण होत असल्याने शिक्षण हक्क कायदा व संविधानात्मक अधिकाराचे उल्लंघन होत असल्याने सदरच्या उपक्रमाबाबत कॉ. श्रीकृष्ण के. बडाख यांनी विवाद उपस्थित केला आहे. सदरचे निवेदन अहमदनगर जि. प. माध्यमिक विभागाचे मा. शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले यांच्या मार्फत नंदकुमार, प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले. रयत शिक्षण संस्था, सातारा यांनी इ. 5 वी ते 10 मधील विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक पातळीवर 100 रुपये पासून ते 2500 रक्कम भरू शकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी गुरुकुल नावाचा उपक्रम राबविला आहे. सदरचा उपक्रम हा सरकारी शिक्षकामार्फतच राबवून पैसे भरणार्‍या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांतून वेगळे बसवून शिकविले जाते. त्यांच्यासाठी डिजिटल वर्ग बनविण्यात आले असून त्यांचा वर्गही वेगळा भरविला जातो. सहभागी विद्यार्थ्यांचे पालक शाळेला पैसे मोजून देत असल्यामुळे त्यांच्याकडे विशेष शिक्षक व खास लक्ष दिले जात आहे. यात पैसे भरू न शकणार्‍या गरीब श्रमिकांचे बालकांना वेगळे बसविले जात असल्याने त्यांच्या बाल मनामध्ये न्यूनगंड निर्माण होऊन त्यांची हेटाळणी होत आहे.
सदरच्या उपक्रमात रयतचे शिक्षकच लोकसहभागाचे नाव देऊन सहभागी प्रती विद्यार्थी शुल्क वसूल करतात. जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी करून घेण्यासाठी शिक्षकांना संस्थेने शाखेच्या पटसंख्येनुसार टार्गेट दिलेले आहे. केंद्र शासन व राज्य शासन राबवीत असलेले नवोदय स्पर्धा परीक्षा, एन. टी. एस, स्कॉलर्शिप यात शिक्षक जादा तास घेऊन मोफत शिकवीत होते. परंतू आता यातून गरिबांचे-श्रमिकांचे विद्यार्थी दुर्भाग्यपूर्ण बाहेर काढले आहे. ही अतिशय निराशजनक बाब आहे. अभ्यासामध्ये अप्रगत असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक जादा तास घेत असतात. मात्र आता त्यांचे म्हणणे आहे की, आम्हाला गुरुकुलचे पैसे भरणार्‍या विद्यार्थ्यांचे तास घ्यावे लागतात. त्यामुळे त्यांनीही आता मोफत जादा तास घेणे बंद केले आहे. सदर बाबीमुळे अप्रगत विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
सदरच्या निवेदनात म्हटले आहे की, गुरुकुल उपक्रम सुरु करण्यासाठी शालेय समित्यांचे ठराव करण्यात आले. सदरचे ठराव हे शिक्षण हक्क कायदा व संविधानात्मक हक्कांचा भंग करणारे असून ते बेकायदेशीर आहेत. संस्थेच्या बहुतांशी शाखांमध्ये शालेय समितीवर अध्यक्ष हे मातब्बर राजकीय पुढारी असून त्यांची पाल्य इंग्रजी माध्यमांचे शाळेमध्ये शिक्षण घेतात. ते सरकारी शाळेमध्ये समितीवर अध्यक्ष असतात, ही बाब हास्यास्पद आहे.
सर्व समावेशक असणार्‍या प्राथमिक शिक्षणामध्ये बालकांच्या मनामध्ये गटतट करून शैक्षणिक विषमता व आर्थिक भेदभाव निर्माण होत असल्याने सदर प्रकरणाची चौकशी करून कारवाई करणेसाठी राज्यस्तरावरील अधिकारी, शिक्षक प्रतिनिधी व पालक प्रतिनिधी यांची संयुक्त समिती नेमण्याची मागणी करण्यात आली आहे.
सदरील निवेदन भगतसिंग ब्रिगेडचे कॉ. श्रीकृष्ण बडाख, मल्हार सेनेचे तालुका अध्यक्ष संजय राऊत, महाराष्ट्र राज्य ख्रिस्ती सेना कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण शिंदे, दलित चळवळीचे दादासाहेब कापसे, पालक प्रतिनिधी राजेद्र राऊत, भारत वैरागर, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष लखन लोखंडे आदिंनी दिले.