औरंगाबाद जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार

मुंबई, दि. 10 एप्रिल -  औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील श्रीरामकृष्ण गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. योजना कार्यान्वित करण्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निधीतून पाच कोटी 79 लाख रुपये उपलब्ध करुन देण्यास यावेळी मान्यता देण्यात आली.
वैजापूर तालुक्यातील 16 गावांतील शेतकर्‍यांनी जायकवाडी प्रकल्पाच्या जलाशयातून शेतीसाठी पाणी आणण्यासाठी ही संस्था स्थापन केली होती. नाबार्ड व औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या अर्थसहाय्यातून 1993 मध्ये ही योजना कार्यान्वित झाली होती. त्यानंतर 1994-95 व 1995-96 या दोन वर्षात अनुक्रमे 755 व 97 हेक्टर क्षेत्राचे सिंचन करण्यात आले होते. त्यानंतर विविध कारणांमुळे ही योजना बंद आहे. याअगोदर नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील अशा प्रकारे बंद असणार्‍या उपसा सिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
ही योजना पुन्हा कार्यान्वित झाल्यास सुमारे 4 हजार 400 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊन शेतकर्‍यांना फायदा होणार आहे. या योजनेची उपयुक्तता लक्षात घेऊन श्रीरामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेचे टप्पा क्र. 1 व 2 (प्रत्येकी दोन पंप) कार्यान्वित करण्यासाठी यांत्रिकी, विद्युत व स्थापत्य कामांच्या अंदाजपत्रकानुसार पाच कोटी 79 लाख इतका निधी जलसंपदा विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.