Breaking News

सिव्हिलमध्ये केमोथेरपी सुविधा हवी - प्रणिती शिंदे

सोलापूर, दि. 10 एप्रिल -  सिव्हिल हॉस्पिलटमध्ये कॅन्सरवर प्रभावी केमोथेरपीची सुविधा सुरू करण्याची गरज आहे. ही सेवा सुरू करण्यासाठी तसेच जिल्हा रुग्णालयासाठी पाठपुरावा सुरू असून पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनीही लक्ष घालण्याची गरज आहे, असे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार शिंदे यांनी राज्यामधील कॅन्सरच्या रुग्णांची वाढती संख्या व उपायासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधी चर्चेमध्ये आमदार शिंदे यांनी भाग घेऊन, उपप्रश्‍नाव्दारे महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत (सध्याची महात्मा फुले योजना) राज्यातील कॅन्सर रुग्णांना एक किंवा दोनच केमोथेरपीच्या डोस मोफत देण्यात येतात. याकडे लक्ष वेधले. कर्करोगावरील उपचारामध्ये महत्त्वाची भूमिका असणार्‍या किमोथेरपीची मोफत सुविधा आता राज्यातील जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येत आहे. साधारणतः जून महिन्यापासून या योजनेचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. त्यात नागपूर, गडचिरोली, पुणे, अमरावती, जळगाव, नाशिक, वर्धा, सातारा, भंडारा आणि अकोला या 10 जिल्ह्यांचा समावेश आहे. पुढच्या टप्प्यामध्ये सिव्हिलमध्येही सुविधा निर्माण होईल. पुढील महिन्यापासून मुंबई येथील टाटा रुग्णालयाच्या सहकार्याने प्रत्येक जिल्हा रुग्णालयातील फिजिशिअन आणि नर्स यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.