Breaking News

हाफिज सईदला अमेरिकेचा दणका

नवी दिल्ली : मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या ‘मिल्ली मुस्लिम लीग’ या राजकीय पक्षाला अमेरिकेने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. या शिवाय ‘तेहरिक-ए-आझादी ए काश्मीर’या संघटनेलाही दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे. अमेरिकेने मंगळवारी हाफिज सईदच्या ‘मिल्ली मुस्लिम लीग’या राजकीय पक्षाला दणका दिला आहे. ‘मिल्ली मुस्लिम लीग’ला दहशतवादी संघटना आणि त्याच्याशी संबंधित सात जणांना अमेरिकेने दहशतवादी म्हणून घोषित केले. ‘लष्कर ए- तोयबाने स्वतःला काही देखील म्हणावे. पण ती एक दहशतवादी संघटनाच आहे. अमेरिका ‘लष्कर’ला राजकारणात येऊ देणार नाही, असे अमेरिकेच्या काऊंटर टेररिझमचे समन्वयक नॅथन सेल्स यांनी सांगितले. या कारवाईनंतर आता अमेरिकेला ‘लष्कर’च्या संपत्तीवर जप्तीची कारवाई करता येणार आहे.