शेतकरी कर्ज शासनाचे पाप - रघुनाथ दादा पाटील
नाशिक, दि. 02, एप्रिल - देशांतर्गत शेतमालाला भाव मिळू द्यायचा नाही, तर विदेशात निर्यात होऊ द्यायची नाही, असा शेतकर्यांवर दरोडा टाकून येथील उद्योजकांची घरे भरण्याचे काम शासन करत आहे. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्याकरत आहेत. मोदी सरकारच्या काळात आत्महत्यांचा कळस झाला आहे. यामुळे शेतकर्यांचे असलेले कर्ज हे या शासनाचे पाप आहे, असे मत शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी येथे व्यक्त केले.
सुकाणू समितीच्या संवाद सभेकडे मात्र शेतकर्यांनीच पाठ फिरविल्याचे चित्र होते. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी संवाद सभेत पाटील बोलत होते. दरम्यान तत्पूर्वी पाटील तसेच सुकाणू समितीच्या पदाधिकार्यांनी शहीद अभिवादन जागर यात्रेनिमित्त येथील हुतात्मा स्मारक येथे शहीद स्तंभास अभिवादन केले. रघुनाथ दादा पाटील म्हणाले, मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांच्या अधिपत्याखाली कृषीमूल्य आयोग समिती आहे. परंतु ही समिती हमीभाव देतच नाही; याच्या परिणामी शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे.
शासकीय तिजोरी ही मंत्री खासदार आणि त्यांच्या चमच्यांचे भले करण्यासाठीच खाली होत आहे. खासदार, आमदारांचे पगार विनाविरोध सहज वाढत आहेत. मात्र आमच्या शेतकर्याच्या वर्षभर कष्टाने पिकवलेल्या पिकाचे भाव मात्र वाढत नाहीत. आता जर शेतकरी पक्ष या विरोधात उतरले नाहीत, तर शेतकर्याला कधीच काही मिळणार नाही. कसलीही वर्गवारी न करता सर्व शेतमालावरील निर्यातबंदी उठविल्यास 5 दिवसात शेतकरी आत्महत्या थांबल्याशिवाय राहणार नाहीत. यासाठीच आमचा लढा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान या संवाद सभेचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गर्दीच्या ठिकाणी आयोजन करूनही शेतकर्यांनी सभेकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते. सभेस जेमतेम 20 ते 25 नागरीक सभेसाठी उपस्थित
होते. त्यापेक्षा अधिक पदाधिकारी व्यासपीठावर बसलेले होते.