Breaking News

सिंधुदुर्गात यंत्राद्वारे उसतोडणीची सुरुवात


सिंधुदुर्गनगरी, दि. 02, एप्रिल - सिंधुदुर्गात ऊस शेतीमध्ये क्रांती घडत आहे. जिल्हयात उसाचे उत्पादन वाढत असतानाच मालवण तालुक्यातील मसुरे येथे ऊस तोडणारी पहिली मशीन दाखल झाली आहे. येथील शेतक-यांनी ऊस तोडण्यास शनिवारी सकाळपासून सुरुवात केली आहे. जिल्हयामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारच्या ऊस तोडणी मशीनचा वापर केला जात आहे. या मशीनच्या वापरातून दिवसाला कमीत कमी 125 टन ऊस तोडला जाणार आहे. मसुरे येथे थांबलेली ऊस तोडणी सुरू झाल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त होत आहे.

सदरची मशीन डी. वाय. पाटील साखर कारखान्याच्या माध्यमातून आणण्यात आली असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी मसुरे येथे दिली.मसुरे येथे या नवीन ऊस तोडणी यंत्राचा शुभारंभ सतीश सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी माहिती देताना सावंत म्हणाले, येथील जास्तीत जास्त ऊस हा डी. वाय. पाटील साखर कारखान्याला वितरीत केला जातो. परंतु बीड जिल्हयामध्ये मोठा पाऊस झाल्याने मजुरांची टंचाई महाराष्ट्रामध्ये मोठया प्रमाणात जाणवू लागली. मजूर टंचाईवर मात करण्यासाठी मशीन वापरली जाते. त्या अनुषंगाने डी. वाय. पाटील साखर कारखान्यामध्ये एम. डी. तसेच चेअरमन, आमदार सतेज पाटील यांच्याशी चर्चा करून सिंधुदुर्गामध्ये हे ऊस तोडणी यंत्र आणण्यात आले. या यंत्राने येथील ऊस तोडणी चांगल्या पद्धतीने होत आहे.

ऊस तोडणी दरम्यान उसाचे शेतामध्ये पडणारे पाचर न जाळता शेतामध्ये कुजवून त्याचा खत म्हणून वापर केल्यास जादा उत्पन्न मिळणार आहे. येथील शेतक-यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी व यातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे. पुढील वर्षीही जिह्यातील ऊस लागवड क्षेत्रामध्ये या यंत्राद्वारे ऊस तोडणी करण्यास प्राधान्य देणार आहोत. यासाठी जिल्हा बँक, डी. वाय. पाटील साखर कारखाना यांच्या मदतीने हे ऊस 
तोडणी यंत्र उपलब्ध करण्याची ग्वाही शेतकऱयांना सावंत यांनी दिली.