Breaking News

शहरटाकळी येथील महालक्ष्मी मातेचा उद्या यात्रोत्सव

शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील ग्रामदैवत महालक्ष्मी मातेचा यात्रोत्सव सालाबादप्रमाणे चैत्र नवमीला सोमवार दि 8 व मंगळवार रोजी संपन्न होत आहे. ग्रामदैवत महालक्ष्मी मातेच्या यात्रोत्सवानिमीत्त ग्रामस्थ यात्रोत्सवाच्या आदल्या दिवशी नाथसागर जलाशयावर कावडीने गंगाजल आणण्यासाठी जातात. कावडीने आणलेल्या गंगाजलाची गावातून सवाद्य मिरवणूक होऊन महालक्ष्मीमातेला गंगाजलाने अभिषेक घालून अलंकार परिधान केले जातात. येथे नवसपूर्ती करण्यासाठी भाविकांकडून शेरणी(गुळ)वाटपाची परंपरा असून सायंकाळी प्रसिद्ध बारागाडी ओढण्याचा कार्यक्रम होतो. त्यानंतर रात्री गावातील मुख्य पेठेतून महालक्ष्मीमातेची पालखी मिरवणूक काढली जाते. यावेळी शोभेच्या दारूसह फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. यात्रोत्सवानिमित्त मंदिरावर विद्युत रोषणाई केली जाते.यात्रेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि.२१ रोजी सकाळी कलावंतांचा हजेऱ्यांचा कार्यक्रम होऊन दुपारी ४ वाजता कुस्त्यांचा जंगी हगामा आयोजित केला आहे यात नामवंत कुस्तीपटु दरवर्षी मोठ्या संख्येने हजेरी लावतात. यात्रोत्सव काळात आयोजित धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन यात्रा पंच कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.