Breaking News

कोट्यवधींचा अपहार करणार्‍या त्रिकुटाला 6 दिवस पोलिस कोठडी

प्रतिनिधी । कोपरगाव - बोगस चिटफंड कंपनीची शाखा उघडून 2 वर्षांत दामदुप्पट रक्कम देण्याचा वायदा करत कोट्यवधींचा अपहार करणार्‍या प्रवीण शंकरराव वरगुडे, राजेंद्र सुकदेव जेजुरकर, दिगंबर जाकीदास बैरागी या त्रिकुटाला शुक्रवारी न्यायालयाने 11 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली, अशी माहिती तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक भरत मोरे यांनी शुक्रवारी दिली. 

1 जानेवारी ते 30 जुलै 2016 या कालावधीत या त्रिकुटाने व्हीनस कॅपिटल सर्व्हिसेस कंपनी व सुखसाई पतसंस्थेची स्कीम चालवून दोन वर्षात पैसे दामदुप्पट करून देण्याची ऑफर दिली. कंपनी सरकारमान्य असल्याचे भासवून विश्‍वास संपादन केला. जास्त व्याजाच्या लालसेपायी अनेकांनी आपल्या आयुष्याची कमाई कंपनीत जमा केली. गुंतवणूकीच्या नावावर कोट्यवधी रूपये जमा करून वेगवेगळ्या तारखांच्या खोट्यानाट्या पावत्या व धनादेश देऊन 1 कोटी 98 लाख 70 हजारांचा अपहार केला. पैसे स्वतःच्या फायद्यासाठी वापरून आर्थिक फसवणूक केली असल्याची फिर्याद कोपरगाव शहर पोलिसात देण्यात आली होती. संवत्सरच्या त्रिकुटाविरोधात गुन्हा दाखल झाला असून मुख्य आरोपी प्रवीण शंकरराव वरघुडे याला नाशिक येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या मदतीने राजेंद्र सुकदेव जेजुरकर, दिगंबर जानकीदास बैरागी या दोन सहकार्‍यांना पोलिसांनी अटक केली. रात्री उशिरापर्यंत चौकशी करून शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले गेले. न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.