दाऊद इब्राहिमची संपत्ती जप्त करा सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला आदेश
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या संपत्तीवर जप्ती आणण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. न्यायमूर्ती आर.के. अगरवाल यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. अंमलबजावणी संचलनालय आणि इतर तपास यंत्रणांनी दाऊदची संपत्ती बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. त्याविरोधात दाऊद इब्राहिमची आई अमिना आणि बहिण हसिना पारकर यांनी याचिका दाखल केली होती. त्यांची याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय सुनावला आहे. मुंबईतील नागपाडा येथे दाऊदची संपत्ती आहे. केंद्र सरकारने त्याच्या संपत्तीचा सविस्तर अहवाल न्यायालयात याआधी सादर केला होता. अमिना आणि बहिण हसिना पारकर या दोघींचाही मृत्यू झालेला आहे. दाऊद हा मोस्ट वाँटेड दहशतवादी असून सध्या पाकिस्तानमध्ये असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.