आपल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणा
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांचे अनुकरण करुन आपल्या मूला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे आवाहन बहुजन लोक अभियानचे महासचिव वसंत सकट यांनी केले. श्रीगोंदा येथील शासकीय विश्रामगृह येथे बहुजन लोक अभियानच्या वतींने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती आयोजित केली होती. यावेळी सकट बोलत होते. पुढे ते म्हणाले की, आजही ग्रामीण भागात आपले समाजातील लोक मुलांना शिक्षण देण्याऐवजी मुलगा मोठा झाला की लगेच विटभट्टी अथवा उस तोडणीसाठी कामाला घेऊन जातात म्हणजे मुलांच्या भविष्याचे मोठे नुकसान करतात. त्यातच आजही दलित समाजातील मुली-महिलांवर अन्याय अत्याचार केला जातोय, पण शिक्षण नसल्यामुळे अन्याय अत्याचार सहन करावा लागतो. म्हणूनच आपल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचेे आवाहन सकट यांनी केले. या वेळी बहुजन लोक अभियानचे जिल्हाध्यक्ष अंकुश शिंदे, तालुकाध्यक्ष सुदाम उलारे, निभोरे मेजर, अविनाश घोड़के, चंदन घोड़के यांची भाषणे झाली. तर यावेळी रावसाहेब राजगुरु, चंद्रकांत राजपुरे, मधुकर ससाणे, बाळू चव्हाण, किसन होले, कैलाश अनर्थ, राजेंद्र परदेशी उपस्थित होते.