Breaking News

सातारा : वणव्यात दोन घरे भस्मसात


सातारा, शिवसागर जलाशयापलिकडे महाबळेश्‍वर पासुन 35 किमी अंतरावर असलेले आहिरमुरा या गावाजवळ असलेल्या उत्तेश्‍वर माणिक मंदीर परिसरात लागलेल्या वणव्याची आग जवळच असलेल्या धनगर वस्तीपर्यंत पोहचली. या आगीत दोन घरे दोन जनावरे व जनावरांचा चारा जळुन भस्मसात झाला. आग विझविण्याच्या प्रयत्नात मानाजी ठकु काळे (वय 75) व जाईबाई राघु ढेबे (वय 70) हे वृध्द पोळल्यामुळे जखमी झाले.

कोयना धरणाच्या शिवसागर जलाशया पलिकडे अतिशय दुर्गम भागात असलेले आहिरमुरा हे गाव आहे या गावचे ग्रामदेवतेचे उत्तेश्‍वर माणिक मंदीर परिसरात वणवा लागला होता. हा वणवा हळुहळु जवळच असलेल्या धनगर वस्ती पर्यंत पोहचला वणव्याच्या आगीने या वस्तीतील दोन घरे वेढली. या मध्ये भगवान गंगाराम काळे व लक्ष्मण कोंडीबा ढेबे यांची दोन घरे जळुन भस्मसात झाली. या आगीत दोन जनावरे यांचाही मृत्यू झाला. या जनावरांच्या चारा होता या चा-यांच्या गंजीही आगीत जळुन खाक झाल्या. या आगीत घरातील संसारोपयोगी साहीत्यांसह लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे घराला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न करीत असलेले दोन वृध्द वणव्याच्या आगीत भाजुन जखमी झाले. जखमी मानाजी काळे यांना उपचारासाठी पुणे येथे तर जाईबाई ढेबे यांना सातारा येथील शासकिय रूग्णालयात भरती करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच तहसिलदार रमेश शेंडगे यांनी तलाठ्यांसह घटनास्थळी भेट दिली. या वेळी शिवसेनेचे गणेश उतेकर गावचे सरपंच आदी उपस्थित होते. ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे त्या दोन व्यक्तींना शासनाच्या वतीने नियमानुसार रोख नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे ही शेंडगे यांनी सांगितले.