Breaking News

देशात अहिष्णूतेचे प्रमाण वाढतंय; मात्र सरकारचं दुर्लक्ष : अजित पवार

सांगली : आज राज्यात अस्वस्थता... असहिष्णुता बघायला मिळते आहे... देशात दोन दिवसांपूर्वी बंद पाळला गेला... दंगल झाली आणि 9 लोकांना आपला जीव गमवावा लागला... त्यांची काय चूक होती... राजस्थानमध्ये मागासवर्गीय आमदारांची घरे जाळली... हे का घडतंय ? सरकार याकडे का लक्ष देत नाही ? पोलिस यंत्रणा सक्षम का नाही ? देशात सध्या संविधान बदलण्याची भाषा होत आहे. संविधान बदलून तर पहा, संपूर्ण देशात हाहाकार माजेल असा इशारा विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी मिरजच्या जाहीर सभेत सरकारला दिला. पुढे ते म्हणाले की, गुजरातमध्ये एका दलित मुलाची हत्या करण्यात आली. रामदास आठवले यांना मंत्रिपद दिले म्हणजे मागासवर्गीयांचे प्रश्‍न संपले का ? मागासवर्गीय समाजाला तुम्हाला संरक्षण द्यावे लागेल. भिमा-कोरेगावला नाहक दोन समाजात तेढ निर्माण करण्यात आली. सरकारने याकडे लक्ष द्यायला हवे होते. ती मुख्यमंत्र्यांची जबाबदारी होती. सरकारने मुद्दाम बघ्याची भूमिका घेतली असा आरोपही पवारांनी केला.


सरकारने व्यक्तीगत स्वातंत्र्यात ढवळाढवळ करू नये. हे सरकार हुकूमशाही आणू पाहत आहे. पण हुकूमशहाचा अंत भयंकर होतो. सद्दाम आणि हिटलरचे काय झाले ? ही गोष्ट राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवावी. पेट्रोलचे भाव वाढले आहेत आणि पेट्रोल पंपासमोर पंतप्रधान मोदी यांचा हसरा फोटो असतो. आता पेट्रोल भरताना लक्षात ठेवा की या फोटोवाल्यामुळेच भाव वाढले आहेत आणि यापुढे कमळाचे बटन दाबू नका, असे ते म्हणाले. मिरजमध्ये एमआयडीसी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कामगार राहतात. त्यांना योग्य मानधन मिळत नाही. नोटाबंदीमुळे 250 लोकांचा मृत्यू झाला. व्यापारही थंड झाला. या सर्व गोष्टींचा आपण विचार करायला हवा म्हणून हे हल्लाबोल आंदोलन आहे असेही पवार म्हणाले. या सरकारने आधी सांगितले मेक इन इंडियाची, मेक इन महाराष्ट्राची गुंतवणूक येणार आहे. आता म्हणतात मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत साडे बारा लाख कोटींची गुंतवणूक येणार आहे. ही गुंतवणूक नक्की कोणत्या गावात येणार तेही सरकारने सांगावे. म्हणजे तेथील तरूण सज्ज होतील. आम्ही हल्लाबोलच्या निमित्ताने ज्या भागात जातो तिथे सर्वात जास्त गर्दी तरुणांची होते. कारण मुख्यमंत्र्यांनी तरूणांना दिलेले रोजगाराचे आश्‍वासन पूर्ण करण्यात ते सपशेल अपयशी ठरले हे सांगतानाच ही जनताच सेना-भाजपचे फसवे सरकार उलथून टाकण्याची ताकद राष्ट्रवादीला देईल असा विश्‍वास विधिमंडळ गटनेते आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला.