Breaking News

दखल - बापटांना चापट, तरी पिळ जाईना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भ्रष्ट मंत्र्यांना पाठिशी घालतात, यात नावीन्य काही नाही. अपवाद फक्त एकनाथ खडसे व प्रकाश मेहता यांचा. खडसे हे स्पर्धक तर मेहता यांची दिल्लीवरून लुडबूड. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी या दोघांचा काटा काढला. राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट तर कायम वादात सापडतात. त्यांच्या अनेक विधानांमुळं सरकारची कोंडी झाली. बापटांना मुख्यमंत्र्यांनी कानपिचक्या दिल्या; परंतु बापट यांचा मूळ स्वभाव कधी उफाळून येईल आणि ते सरकारची कशी अडचण करतील, याचा कधीही भरवसा देता येत नाही.
 
...................................................................................................................................................
दोन न वर्षांपूर्वी राज्यात तूरडाळ खरेदीचा विषय चांगलाच गाजला. डाळ खरेदीत भ्रष्टााचार झाल्याचा विरोधकांचा आरोप; पण मुख्यमंत्र्यांनी त्या खात्याचे मंत्री गिरीश बापट यांना अभय देताना सारं काही योग्यच आहे, असा निर्वाळा दिला. तथापि महालेखापरीक्षकांच्या ताज्या अहवालात तूरडाळ खरेदीत झालेल्या गोंधळावर शिक्कामोर्तबच झालं आहे. केंद्र सरकारकडून 66 रुपये किलो दरानं मिळालेली डाळ सडून वाया जात असताना राज्य सरकारनं वायदे बाजारात 102 रुपये प्रति किलो दरानं डाळ खरेदी केली. त्याबाबत महालेखापरीक्षकांच्या अहवालात प्रश्‍न उपस्थित करण्यात आला आहे. वास्तविक बापट यांच्या भ्रष्ट कारभाराबाबत विरोधकांनी आवाज उठवायला हवा होता; परंतु विरोधकही त्यांच्या काळातील गैरव्यवहार उघडकीस येण्याच्या भीतीनं मौनात गेले आहेत. महालेखापरीक्षकांचा अहवाल राज्य विधिमंडळाचं अधिवेशन संपण्याच्या शेवटच्या दिवशी मांडल्यानं त्यावर चर्चा होऊ शकली नाही. असं असलं तरी जनतेच्या दरबारात बापटांचा कारभार न्यायला विरोधकांचे हात कुणी धरलेले नाहीत. गेल्या साडेतीन वर्षांत बापट हे सातत्यानं वादगˆस्त ठरले आहेत. कधी डाळ खरेदी, तरी व्यापार्‍यांवरील कथित धाडी यावरून त्यांच्यावर आरोप झाले. बापट यांच्याकडंच असलेल्या अन्न आणि औषध प्रशासन खात्याच्या ढिसाळ कारभारावरही या अहवालात ताशेरे ओढले आहेत. राज्यात पुरवठा केल्या जाणार्‍या औषधांचा दर्जा न तपासताच ही खरेदी झाली, असं या अहवालात म्हटलं आहे.
बापट यांनी अनेकवेळा वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यानंतर त्यांना सारावसारव करावी लागली आहे. याआधी बापट यांनी महाविद्यालयीय विद्यार्थ्यांसमोर म्हटले होतं, तुमच्या मोबाईलमध्ये काय काय असतं, ते माहित आहे. तुम्ही आम्हाला म्हातारे समजू नका, पिकल्या पानाचा देट हिरवा . त्यावर उलटसुलट चर्चा झाली होती. आता पुन्हा  एकदा बापट यांची जीभ घसरली आहे. त्यांनी मुलींबाबत वादग्रस्त विधान केलं. चल म्हटली की लगेच चालली असं वक्तव्य बापट यांनी केलं आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात बापट यांचा तोल गेला. विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या उपस्थितीत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. याविरोधात राष्ट्रवादीनं आक्रमक रुप धारण क रीत पोस्टरबाजी केली. त्यांच्याविरोधात बॅनर लावून त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. बापट पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळं अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. ठेवलेली घरात आली की नवरा-बायकोंची भांडणं होणारच, असं विधान बापट यांनी पिंपरीतील एका कार्यक्रमात केलं. व्यापारी फेडरेशनच्या वतीनं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व बापट यांचा रविवारी चिंचवड येथे जाहीर सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. रेशन व्यापारी व सरकार हे नवरा-बायकोसारखे असतात, तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन क रावा लागतो, असं माजी खासदार गजाजन बाबर म्हणाले होते. त्यावर बापट यांनी वरील विधान केलं. त्या वेळी चिठ्यांबाबतचं त्यांचं वक्तव्य असंच गाजलं होतं.
काय आहेत त्या मागण्या आत्ताच करून घ्या, पुन्हा सत्ता येईल की नाही सांगता येत नाही, या विधानामुळं वादग्रस्त ठरलेल्या बापट यांनी शुक्रवारी महापालिकेच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा तसंच विधान केल्यामुळं त्याची चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राजकारणात पुढं काय होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळं सत्ता असेपर्यंत कामं पूर्ण करून घ्या, असा सल्ला त्यांनी पुणे महापालिकेच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना दिला. त्यांच्या या विधानामुळं पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. बापट यांनी काही दिवसांपूर्वी शेतीसंबंधीच्या एका मेळाव्यात वादग्रस्त विधान केलं होतं. संघटनांनी त्यांच्या मागण्या आत्ताच करून घ्याव्यात, पुन्हा सत्ता येईल की नाही हे सांगता येणार नाही, असं बापट त्या मेळाव्यात म्हणाले होते. त्यांच्या या विधानाची विरोधी पक्षांनी जोरदार खिल्ली उडविली होती. तशाच स्वरूपाचं विधान त्यांनी केलं. महापालिकेच्या वतीने सेव्हन लव्हज हॉटेल ते वखार महामंडळ या दरम्यान उड्डाणपुलाला मंजुरी देण्यात आली आहे. या उड्डाणपुलाच्या कामाचं भूमिपूजन बापट यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना सत्ता आहे तोपर्यंत कामं करून घ्या, असा सल्ला त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांना दिला. राजकारणात पुढं कधी काय होईल, हे माहीत नसतं. उड्डाणपुलाचं भू मिपूजन झालं; पण हे काम पूर्ण झाल्यावर उद्घाटनाला मलाच बोलवा. आता एक वर्ष राहिलं आहे. सत्ता आहे तोपर्यंत कामं करून घ्या, असे ते म्हणाले. सत्ताधार्‍यांनी कितीही प्रतिकूल जनमत असलं, तरी कार्यकर्त्यांना धीर द्यायचा असतो. पुन्हा आपलीच सत्ता येईल, असं सांगायचं असतं; परंतु राज्य सरकारची कामगिरी चांगली नसावी, असं बापटांच्या वक्तव्यातून वारंवार ध्वनित होत असतं. भाषणादरम्यान, मोबाइलवर बोलणार्‍या एका तरुणाला उद्देशून बापट यांनी, कोणाशी पत्नीशी बोलतो आहेस का, अशी विचारणा केली. त्यावर विवाहित नसल्याचं तरुणानं सांगताच, लग्न नाही झाले तर तू भाजपमध्ये ये. तुला नोकरी देतो, रोजगार देतो, असं बापट म्हणाले. त्यांच्या या मिश्किल पण वादग्रस्त विधानामुळं विरोधकांकडूनही त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे.