Breaking News

जीसॅट-6 ए या उपग्रहाचा संपर्क तुटला

बंगळुरू -प्रक्षेपणाच्या 48 तासांच्या आतच ’जीसॅट- 6 ए’ या उपग्रहाचा संपर्क तुटला आहे. हा ’इस्रो’साठी मोठा धक्का आहे. या उपग्रहाच्या बांधणीसाठी 270 कोटी रुपये खर्च झाले होते. उपग्रहाचं प्रक्षेपण केल्यानंतर 48 तासांनंतर त्याच्या तिसर्‍या आणि अंतिम टप्प्यात या उपग्रहाशी संबंध तुटल्याची माहिती इस्त्रोनं आपल्या अधिकृत वेबसाईटवर दिली आहे. जीएसएलव्हीच्या साहय्याने या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. 


प्रदीर्घ काळानंतरच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताचा उपग्रहाशी असेला संपर्क तुटला आहे. हा उपग्रह 1 एप्रिलला (रविवार) अंतिम जिओस्टेशनरी कक्षेत ठेवण्यात येणार होता. या उपग्रहाशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे इस्रोने एका पत्रकात म्हटले आहे. आता, या उपग्रहाशी पुन्हा संपर्क प्रस्थापित झाला तरच त्याला नियोजित कक्षेत स्थिर करणे शक्य होणार आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, रॉकेटच्या दुसर्‍या भागात यावेळी दोन सुधारणा करण्यात आल्या होत्या. यात अधिक वेगाची क्षमता असलेले विकास इंजीन आणि इलेक्ट्रोमॅकेनिकल अ‍ॅक्ट्यूएशन सिस्टमचा समावेश करण्यात आला होता.
‘जीसॅट-6 ए’ या उपग्रहामुळे दुर्गम ठिकाणी तैनात असलेल्या भारतीय सैन्य दलांमध्ये समन्वय आणि संवाद अधिक सुलभ होणार होते. ’जीसॅट-6 ए’ या उपग्रहाकडे सर्वात मोठा अ‍ॅँटेना असून इस्त्रोनेच त्याची निर्मिती केली होती. सर्वसामान्यांच्या दृष्टीने आणि भारतीय सैन्याच्या दृष्टीने हे उपग्रह अत्यंत महत्त्वाचे ठरणार होते. इस्रोच्या या महत्त्वाकांक्षी मोहीमेला रविवारी हादरा बसला. शनिवारपासून उपग्रहाशी संपर्क तुटला होता.