Breaking News

आसारामला जन्मठेप ! शरद व शिल्पीला 20 वर्षांचा कारावास; जोधपूर न्यायालयाचा निर्णय ;

जोधपूर : स्वयंघोषित वादग्रस्त आध्यात्मिक गुरू आसाराम बापूला 2013 च्या बलात्कार प्रकरणी जोधपूर न्यायालयाने बुधवारी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.शिक्षा ऐकल्यानंतर आपले उर्वरीत आयुष्य तुरुंगातच जाणार याची कल्पना आलेला आसाराम कोर्टात ढसाढसा रडला. आसारामवर गेल्या 5 वर्षांपूर्वी बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. मूळची उत्तर प्रदेशच्या शहाजहाँपूर येथील आणि आसाराम याच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील आश्रमात शिकणार्‍या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आसारामला अटक करण्यात आली होती. आसारामने जोधपूरनजीकच्या मनाई भागातील आश्रमात बोलावून 15 ऑगस्ट 2013 च्या रात्री आपल्यावर बलात्कार केल्याचा तिचा आरोप होता. 


आसारामला इंदूरहून अटक करून 1 सप्टेंबर 2013 रोजी जोधपूरला आणण्यात आले होते. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांनी आसाराम व 4 सहआरोपींवर 6 नोव्हेंबर 2013 रोजी आरोपपत्र दाखल केले होते. संचिता गुप्ता उर्फ शिल्पी ही या दुर्दैवी मुलीच्या हॉस्टेलची वॉर्डन होती तर छिंदवाडातील या आश्रमशाळेचा संचालक होता. शिल्पी व शरदचंद्र यांनी आसारामला या कृष्णकृत्यामध्ये साथ दिल्याचे न्यायालयात सिद्ध झाले व त्यांनाही 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.
आसाराम दोषी ठरला, आम्हाला न्याय मिळाला. या लढ्यात ज्यांनी-ज्यांनी आम्हाला मदत केली त्या सर्वांचे मी आभार मानतो. आता मी आशा करतो, की आसारामला कठोर शिक्षा मिळेल. तसेच, मी आशा करतो की, हत्या करण्यात आलेल्या आणि अपहरण झालेल्या साक्षिदारांनाही न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया शाहजहाँपूर पी डितेच्या वडिलांनी दिली आहे. आम्हाला आपल्या न्याव्यवस्थेवर पूर्ण विश्‍वास आहे. आम्ही आमच्या कायदेशीर तज्ज्ञांबरोबर चर्चा करून पूढील निर्णय घेऊ, असे आसारामच्या प्रवक्त्या नीलम दुबे यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी सकाळी असाराम यांचे भक्त कारागृहाजवळ हार घेऊन पोहोचले होते. मात्र त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
राजस्थान आणि गुजरात येथील दोन वेगवेगळ्या प्रकरणात आसारामचा समावेश असल्याप्रकरणी तपास करण्याता आला आहे. राजस्थानात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानुसार, उत्तप्रदेशातील शाहजहाँपूर येथील एका अल्पवयीन मुलीने आसारामवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. यात त्या मुलीने, जोधपूरजवळील मनाई गावातील आश्रमात 15 ऑगस्ट 2013 च्या रात्री हा प्रकार घडल्याचे म्हटले आहे. तर गुजरातमध्ये, सुरत येथील दोन बहिणींनी आसाराम आणि त्याचा मुलगा नारायन साईविरोधात बलात्काराचे वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.