Breaking News

‘हमारा स्टेशन,हमारी शान’ उपक्रमाचा शुभारंभ

2 ते 8 ऑक्टोबर दरम्यानराबविला जाणार उपक्रम

मुंबई, दि. 03 -  मुंबईतील 36 रेल्वे स्टेशन सुंदर करण्याच्या ‘हमारा स्टेशन,हमारी शान’ याउपक्रमाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शुभारंभ करण्यात आला. हा उपक्रम 2 ते 8 ऑक्टोबर 2016 या कालावधीत राबविला जाणार आहे.
या प्रसंगी खासदार पुनम महाजन, आमदार आशिष शेलार, अभिनेता अनिल कपूर, रेल्वेचे अधिकारी, स्वयंसेवी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, हमारा स्टेशन हमारी शान हा एक चांगला उपक्रम असून आपल्या जीवनाच्या अविभाज्य घटक असलेल्या रेल्वे स्टेशनचा कायापालट होण्याचे काम या माध्यमातून होणार आहे. पंतप्रधान आणि रेल्वे मंत्री यांच्या पुढाकाराने लवकरच मुंबईत चर्चगेट ते विरार आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेलपर्यंत एलिव्हेटेड कोरिडॉर उभारण्यात येणार आहे. यामुळे उपनगरीय रेल्वेवरील ताण कमी होईल. मुंबई मेट्रोमुळे प्रवासी वाहतुक क्षमता वाढणार असून मुंबईतील सार्वजनिक ठिकाणे सुंदर ठेवण्याची गरज असल्याचे श्री फडणवीस म्हणाले.
आगामी काळात मुंबईतील सर्व सार्वजनिक वाहतुक सेवा एका तिकिटाखाली आणण्यात येणार असून यासाठी मोबाईल पचा वापर करण्यात येईल. रेल्वे मंत्री यांच्या पुढाकाराने मुंबईतील 17 रेल्वे स्टेशनवर वाय-फाय सुविधा देण्यात आली आहे. आता आगामी काळात वाय-फाय सुविधा देणे गरजेचे असून  प्रत्येक सार्वजनिक वाहतूक सेवेच्या ठिकाणी वाय-फाय सुविधा पुरविण्यात येणार आहे. मुंबईला सुंदर करण्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. देशातील प्रत्येक नागरिकांला ट्रेनमध्ये प्रवास करताना आनंद वाटला पाहिजे, असेही श्री फडणवीस यावेळी म्हणाले.
केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू म्हणाले की, एकला चलो रे, या उक्तीप्रमाणे चला, लोक मागे येतील. आज एका नवीन उपक्रमाची सुरूवात झाली असून आपल्याला मुंबई स्वच्छ करण्याबरोबर सुंदर करायची आहे. आपल्याला यासाठी आपल्या सवयी बदलाव्या लागतील. स्वयंसेवी संघटना आणि लोकसहभाग यांच्यातून सामाजिक बदलाव आणता येतो, असेही ते यावेळी म्हणाले.
खासदार पुनम महाजन यावेळी म्हणाल्या की, एम.ए.डी.फाऊंडेशनने हमारा स्टेशन हमारी शान हा उपक्रम हातात घेऊन प्रशंसनीय काम केले आहे. सुरेश प्रभू रेल्वेमंत्री झाल्यापासून रेल्वेला आणि मुंबईकरांना भरपूर काही दिले आहे. पुढील तीन वर्षात मुंबईतील रेल्वे स्टेशनवर सर्व सुविधा पुरविण्यात येईल, असेही त्या यावेळी म्हणाल्या.