Breaking News

स्मशानभूमीत प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाऊन दत्तु गीतेंनी गरम पाण्याच्या कुंडात धुतले हात

भिवंडी/प्रतिनिधी ।  शासकीय इमारती, पशुवैद्यकीय दवाखाने, रस्ते, पुल, मोर्‍या इतकेच नाही तर मुडदे जाळणार्‍या स्मशानभुमीतील कामांतही भ्रष्टाचार करणारे ठाणे जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता दत्तु गीते यांनी अकलोली या तिर्थक्षेत्री असलेल्या गरम कुंडाच्या पाण्यात हात धुवून तब्बल 24 लाख 67 हजाराचा निधी स्वाहा केला आहे. दरम्यान गेल्या एक आठवड्यापासून लोकमंथनने वृत्तमालिका सुरू केल्यानंतरही दत्तु गीतें आणखी शेफारले असून माध्यमांमधील आपल्या भाटांचे मानसिक बळ वाढविण्यासाठी आपले कुणी काही वाकडे करू शकत नाही असा धीर देत आहेत.


मुंबईच्या बगलेतील जिल्हा, आदिवासी लोकसंख्या या बाबींमुळे महाराष्ट्र शासनाचे ठाणे जिल्हा परिषदेवर अधिक प्रेम आहे. त्याहूनही अधिक प्रेम शाखा अभियंता दत्तु गीते यांच्यावर आहे. असे म्हणण्याइतका पुरावा भिवंडीकरांकडे उपलब्ध आहे. मात्र हे पुरावे घेऊन जायचे कुणाकडे? जिल्हा परिषदेत वरिष्ठ अधिकार्‍यांकडे जावे तर बहुतांशी दत्तु गीतें च्या दरोडेखोरीत वाटेकरी झाले आहेत. प्रसार माध्यमांकडे जावे म्हटले तर एखाद दुसरा अपवाद वगळला तर माध्यमांतील बरीचशी मंडळी दत्तु गीते यांनी चोखून फेकलेली हाडे चघळणारी. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार या मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांकडे जावे म्हटले तर दत्तु गीतेंनी तयार केलेल्या सायपनमध्ये बसलेल्या मंडळींनी आधीच मुख्यकार्यकारी अधिकार्‍यांच्या दालनापर्यंत दत्तु गीते या आपल्या अन्नदात्यासाठी पायघड्या अंथरलेल्या. मग तक्रार करावी कुणाला? या परिस्थितीचा फायदा घेऊन दत्तु गीते भिवंडीच्या कुरणात वळू सारखा चरत आहे. दत्तु गीतेंचा आणखी एक खास ठेवणीतला पुरूषार्थ दाखविणारा गुण पुराव्यासह हाती आला आहे. शेवटी पापाच्या क माईतून कमावलेला रोकडा कुठेतरी खर्च करावा तर लागणार ना? मात्र तो गुण आज या ठिकाणी लिहिण्याचे औचित्य नाही.
तात्पर्य इतकेच की, कुठलाही माणूस आपल्या कार्यशैलीपासून एखादे घर दुर ठेवतो. दत्तु गीते या महाशयांनी हा संकेतही पाळला नाही. जिल्हा परिषद अंतर्गत इमारत दुरूस्ती, दवाखाने, रस्ते, पुल, मोर्‍या इतकेच काय तर मुडदे जाळण्यासाठी आवश्यक असलेल्या स्मशानभूमीच्या कामातही भ्रष्टाचार करून प्रेताच्या टाळूवरचे लोणी आणि प्रेतामागे फेक लेल्या लाह्यांवर पोटाची खळगी भरली. एव्हढा निर्लज्जपणा केल्यानंतरही भुक भागत नाही तो माणूस कसा असेल? अकलोली या तिर्थक्षेत्रावर गरम पाण्याचे कुंड आहेत. किंबहूना या गरम पाण्याच्या कुंडांमुळेच अकलोली तिर्थक्षेत्र म्हणून प्रसिध्द झाले. या गरम पाण्याच्या कुंडांना संरक्षक भिंत बांधण्यासाठी चोवीस लाख सदुसष्ट हजाराचा निधी मंजूर होता. प्रत्यक्षात भिंत उभी राहिली नाही. खर्च तर झाला. मग निधी गेला कुठे?(क्रमशः)
चौकट
ठाणे जिल्हापरिषदेत दत्तु गितेच्या कर्तृत्वाचे गुलछर्ये
दत्तु गीते...एक शाखा अभियंता तब्बल सोळा वर्ष एकाच ठिकाणी आपल्या कर्तृत्वाचे गुलछर्ये उधळत आहे. भिवंडी उपविभागात शाखा अभियंता असलेल्या या दत्तुकडे तीन वर्षापासून चक्क उपअभियंता पदाचा पदभार आहे. महाराष्ट्रात शेती दुष्काळाच्या सावटाखाली आहे असे ऐकले होते, पण बांधकाम विभागातही उपअभियंत्यांचा दुष्काळ पडला आहे म्हणून महाराष्ट्र सरकार आणि ठाणे जिल्हा परिषद प्रशासन दत्तु गितेवर एव्हढे मेहेरबान झाले का?
तीन वर्षात एकही लायक उपअभियंता मिळाला नाही म्हणून दत्तु गितेला भिवंडी उपविभाग आंदण दिला का?
सोळा वर्ष एकाच ठिकाणी सेवा देणारा दत्तु गिते आहे तरी कोण? सोळा वर्षात एकदाही बदलीच्या प्रक्रियेतून दत्तु गिते कसा सुटला? कोण आहेत दत्तु गितेचे पाठीराखे? कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनीही दत्तु गितेच्या प्रभावासमोर नांगी का टाकली? विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्यमंत्र्यांचे खास दूत म्हणून ठाणे जिल्हा परिषदेत रूजू झाले असतांनाही विवेक भिमनवार दत्तु गितेला शरण का जातात?
नेमकी कुठल्या षडयंत्राची करणी केली दत्तु गितेंने? जिप प्रशासनाचे कुठले इंगीत आहे दत्तु गितेकडे? जिल्हा महसुल प्रशासनाचेही प्रपंच चालविण्याची ताकद असलेला या दत्तु गितेची कुंडली सादर करणारी लेखमाला...
उद्याच्या अंकात
घोडगांंव भोगाडे चा तेहतीस लाखाच्या निधीचा हिशेब काय ?(कार्यारंभ आदेश 24/3/2017) घोडेगाव-कोल्हेपाडा-गोठणपाडा दीड कि.मी.चा रस्ता बेपत्ता कसा झाला? (21/8/2016) अकलोली तिर्थक्षेत्राचा निधी कुणावर उधळला.