Breaking News

उत्तरप्रदेशात झालेल्या अपघातात 11 ठार

लखीमपूर खिरी (उत्तरप्रदेश) : उत्तरप्रदेशातील राष्ट्रीय महामार्ग 24 वर शनिवारी सकाळी टाटा मॅजिक व ट्रकमध्ये झालेल्या अपघातातात 11 जणांचा मृत्यू झाला. यापैकी 9 जण जागीच ठार झाले. तर दोघांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. या अपघातात 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. घटना लखीमपूर जिल्ह्यातील पसगवाच्या उचौ लिया येथील राष्ट्रीय महामार्ग 24 वर झाली. येथे शाहजहांपूरहून प्रवाशांना घेऊन जाणारी टाटा मॅजिक एका ट्रकला जाऊन भिडली. ही धडक एवढी भयानक होती, की जागेवरच 9 जण ठार झाले. तर दोन जणांचा शाहजहांपूर जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. सर्व जखमींना याच रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टाटा मॅजिक क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन शाहजहांपूरहून सीतापूरकडे जात होता. यात 7 लोकांना बसवण्याची परवानगी आहे. मात्र या टाटा मॅजिकमध्ये एकूण 18 लोक दाबून बसवण्यात आले होते. मृतांची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. टाटा मॅजिकमध्ये एक महिला 2 वर्षांच्या चिमुकलीला मांडीवर घेऊन बसली होती. अपघात झाला तेव्हा चिमुकलीला काही होऊ नये म्हणून महिला खाली वाकली. त्यामुळे ही चिमुकली या अपघातातून बचावली. पण आईचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला.