Breaking News

राज्यात 10 कोटी क्विंटल साखरेचे उत्पादन साखर उत्पादनात सोलापूरचा विक्रम

मुंबई : चालू गाळप हंगामात राज्यातील 187 साखर कारखान्यांमधून 10 कोटी क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यात सर्वाधिक साखरेचे उत्पादन हे सोलापूर जिल्ह्यात झाले असून कोल्हापूर जिल्हा हा दूसर्‍या क्रमांकावर आहे.मार्च महिन्याच्या सुरुवातीला 50 साखर कारखान्यांचा गळीत हंगाम बंद झाला होता. असे असले तरीही 150 साखर क ारखान्याचा गळीत हंगाम अजुनही सुरू आहे. 

सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्याने साखर उत्पादनात यंदा नवीन विक्रम केला आहे. 27 मार्च 2018 पर्यंत झालेल्या गाळपानुसार यंदा सोलापूर जिल्ह्याने कोल्हापूरला मागे टाकत सर्वाधिक 1 कोटी 75 लाख 68 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. 1 कोटी 64 लाख 20 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन करत क ोल्हापूर जिल्हा दुसर्‍या क्रमांकावर आहे. 1 कोटी 29 लाख क्विंटलचे उत्पादन करून अहमदनगर तिसर्‍या तर पुणे जिल्हा 1 कोटी 18 लाख क्विंटल साखर उत्पादनासह चौथ्या क्रमांकावर आहे. सरासरी उतार्‍यात कोल्हापूर जिल्ह्याने पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. अहमदनगर विभागातील 27 कारखान्यांनी 1 कोटी 30 लाख टन ऊस गाळप केले असून त्यातून 1कोटी 40 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. अहमदनगर विभागातील आणखी 26 कारखाने सुरू आहेत. औरंगाबाद विभागातील 24 कारखान्यांनी 81 लाख टन उसाचे गाळप करून 80 लाख क्विंटल साखरेचे इत्पादन केले आहे. तर नांदेड विभागातील 32 कारखान्यांनी 1 कोटी 11 लाख टन ऊस गाळप करून 1 कोटी 17 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. अमरावती आणि नागपूर विभागातील 6 कारखान्यांनी 10 लाख 59 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. दरम्यान, 142 पैकी निम्म्याहून अधिक कारखाने हे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बंद होतील. तर उर्वरित सर्व कारखान्यांचा गाळप हंगाम एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात संपण्याची शक्यता आहे.