Breaking News

सरन्यायाधीशांच्या विरोधात महाभियोग ? विरोधकांच्या निर्णयाला समाजवादी पक्षाचा पाठिंबा

नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याच्या विरोधकांच्या निर्णयाला समाजवादी पक्षाने (सप) देखील पाठिंबा दिला आहे. न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यासाठी आणि निर्विवाद एकात्मतेसाठी चालवण्यात येणार्‍या महाभियोगाला समाजवादी पक्षाचा पाठिंबा असल्याचे मत सपचे नेते घनश्याम तिवारी यांनी व्यक्त केले. या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डी.पी. त्रिपाठी यांनी काँग्रेससह विरोधी पक्ष सरन्यायाधीशांच्या विरोधात महाभियोगाचा प्रस्ताव आणत असल्याचे सांगितले होते. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस अशा अनेक विरोधी पक्षांनी सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांच्या विरोधात महाभियोग चालवण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केल्या आहेत. या प्रकरणी ममता बॅनर्जी यांनी ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांची भेट घेतली आहे. तसेच सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याबाबतच्या शक्यतांवर चर्चा केली. त्यानंतर या हालचाली होताना दिसत आहेत. महाभियोगाचा हा प्रस्ताव 11 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ 4 न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या आरोपांबाबत चालवण्यात येणार आहे. यात सरन्यायाधीशांनी काही खटल्यांची हाताळणी करताना संकेत न पाळल्याचे म्हणण्यात आले आहे. सरन्यायाधीश मिश्रा यांनी खटल्यांची वाटप करताना काही महत्त्वाच्या प्रकरणांचे काम क्रमानुसार संकेत न पाळता न्यायमूर्ती चेलमेश्‍वर, रंजन गोगई, लोकुर व कुरीयन जोसेफ या 4 वरिष्ठ न्यायाधीशांना टाळून इतर कनिष्ठ न्यायाधिशांना दिल्याचा आरोप आहे.