शाळा एकत्रीकरणाबाबत सकारात्मक तोडगा काढणार - प्रीतेश राऊळ
सिंधुदुर्गनगरी, दि. 27, मार्च - ‘एक गाव एक शाळा’ या जि. प. च्या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता देऊनही 2 कोटी 67 लाख 11 हजार 600 रुपयांची शिक्षक पगारापोटीच्या रकमेची बचत होणार आहे. या उपक्रमामुळे राज्यात अव्वल स्थानावर असलेल्या सिंधुदुर्गची गुणवत्ता आणखी उंचावण्यास मदत होणार आहे. मात्र, तब्बल 300 प्राथमिक शिक्षक अ तिरिक्त होणार असल्याने शिक्षक संघटनांनी या धोरणाला विरोध केला आहे. मात्र, येत्या महिनाभरात याबाबत सर्वांशी चर्चा करुन सकारात्मक तोडगा काढणार असल्याची माहिती जि. प. शिक्षण सभापती प्रीतेश राऊळ यांनी दिली. ‘एक गाव एक शाळा’ उपक्रम राबविण्याबाबतचा प्रस्ताव तयार करुन तो शासनाला पाठविण्याच्या विचार विनियमाची खास सभा रेडी येथे झाली. जिल्ह्यात सध्या 1 हजार 443 प्राथमिक शाळा आहेत. यापैकी 287 शाळांमध्ये कोणताही बदल होणार नाही. मात्र समायोजनानंतर उर्वरित 1 हजार 156 शाळांची संख्या 704 वर येणार आहे. यामधील 9 हजार 967 विद्यार्थ्यांना वाहतूक खर्चापोटी प्रतिमहिना किमान एक हजार प्रमाणे वर्षाकाठी नऊ कोटी 616. लाख 70 हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत.