देवगडमध्ये दोन शेतकर्यांना शासनाची आर्थिक मदत
सिंधुदुर्गनगरी, दि. 27, मार्च - 2017 मध्ये पावसाळा कालावधीत नुकसान झालेल्या तालुक्यातील पुरळ व धालवली येथील शेतक-यांना देवगड महसूल विभागाच्या वतीने 55 हजाराची आर्थिक मदत देण्यात आली. 28 सप्टेंबर रोजी पुरळ येथील शेतकरी पंढरीनाथ गणपत पुजारी यांच्या गोठ्यावर वीज पडून गोठ्याचे व आतील जनावरांचे नुकसान झाले होते. त्यांना महसूल प्रशासनाकडून 25 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली. या मदतीचा धनादेश तहसीलदार वनिता पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. तर 30 ऑगस्ट रोजी धालवली येथील सुभाष गंगाराम सरवणकर यांच्याही मालकीच्या जनावरांचे अतिवृष्टीतील विजेच्या धक्क्याने नुकसान झाले होते. त्यांना 30 हजाराची नुकसान भरपाई देण्यात आली. या मदतीचा धनादेश नायब तहसीलदार प्रिया परब यांच्या हस्ते देण्यात आला.