Breaking News

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी धास्तावले


कर्जत तालुक्यात कुळधरण, राशिन, भांबोरा, सिध्दटेक, कोपर्डी यासह सर्वच भागात वातावरणात बदल झाला आहे. ढगाळ वातावरण निर्माण झाले असुन, अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत असुन शेतकरी धास्तावले आहेत. हाताशी आलेला शेतकर्‍याचा घास ओढला जातो की काय असा मोठा प्रश्‍न आ करून बसला आहे. आपल्या शेतातील काकडी, मिरची, कलिंगड, कांदा, टॉमॅटो आदी पिकांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या पिकांवर रोगराईचा प्रभाव पडत असताना दिसत आहे. मावा, तुडतुडे, भूरी आदी रोगांचा पिकांवर दुष्परिणाम होत आहे. मोठ्या कष्टातून तयार केलेल्या पालेभाज्या तसेच फळबागांना बाधा पोहोचली आहे.पालेभाज्या, फळभाजांचे दर घटल्याने अनेक शेतकर्‍यांनी भर पिकात नांगर घातल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. काढणीला आलेली तसेच काढणी झालेली पिके, धान्य भिजण्याच्या भीतीने शेतकर्‍यांची चांगलीच धावपळ उडाली.
सध्या शेतात कांदा पिकाची काढणी, काटणी, साठवण चालू आहे. तसेच गहू, हरभरा काढणी व मळणीची कामे चालू आहेत.वातावरणात बदल झाला असुन ढगाळ वातावरण तयार झाले आहे.तीन-चार दिवसांपासून ढगाळ भरुन आल्याने अवकाळी पाऊस पडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतातील पिके सुरक्षित ठिकाणी नेणे किंवा शेतातच जाग्यावर झाकून ठेवण्यासाठी शेतकर्‍यांना मोठी कसरत करावी लागत आहे. सध्या कांद्यासह इतर शेतमालाचे बाजारभाव पूर्णपणे पडले असल्यामुळे शेतकरी अडचणीत आला असतानाच अवकाळी पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.