Breaking News

कंत्राटदारांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या कार्यकारी अभियंता कोळी रडारवर

मुंबई/ विशेष प्रतिनिधी - मध्य मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्ट कार्यकारी अभियंता श्रीमती कोळी आणि ए. जे. पाटील यांच्या कार्यशैलीने केवळ सार्वजनिक निधीचा अपहार होतो असे नाही तर अटी शर्तींच्या अधीन राहून काम करणार्‍या शासकीय कंत्राटदारांचेही बळी घेतले जात असल्याने साबां वर्तुळात संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान या अभियंत्यांनी खोटी प्रक्रिया राबवून दोन महिन्यात तब्बल 22 कोटींचा केलेल्या अपहाराच्या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश भरारी तथा दक्षता पथकाला अवर सचिवांनी दिले आहेत. आ. चरणभाऊ वाघमारे यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.

सार्वजनीक बांधकाम खात्याच्या भ्रष्ट कारभाराच्या स्पर्धेत मुंबई साबां प्रादेशिक विभागाच्या अंतर्गत असलेला मध्य मुंबई साबां विभागही अग्रभागी असल्याचे बीडीडी चाळ प्रकरणातून समोर आले आहे. बीडीडी चाळ दुरूस्ती देखभालीच्या नावाखाली फेब्रूवारी, मार्च 2016 या दोन महिन्यांच्या कालावधीत या ठिकाणी कार्यरत असलेल्या तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांनी तब्बल 22 कोटी रूपयांचे खोटे देयके तयार करून तेवढ्या रकमेचे धनादेश वटविल्याची बाब उघड झाली आहे.
फेब्रूवारी, मार्च 2016 या कालावधीत तत्कालीन कार्यकारी अभियंता आणि त्यांच्या सहकारी अभियंत्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील वरळी साबां उपविभागामधील बीडीडी चाळीची देखभाल आणि दुरूस्तीच्या खोट्या निविदा काढून बनावट करारनामे तयार केले. खोटे कार्यादेश म्हणजे वर्क आर्डर दिल्या.संबंधित कामे प्रत्यक्षात न करता त्या कामांची बावीस कोटींची देयके खोटी तयार केली. आणि त्या बावीस कोटींचे धनादेश काढून वटविले. हे प्रकरण आ. चरणभाऊ वाघमारे यांनी या काळातील मोजमाप पुस्तिका आणि संशय असलेल्या देयकांच्या धनादेशांच्या सत्यप्रतीवरून प्रकाशात आणल्यानंतर शासनाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई साबां दक्षता पथकाला आदेश दिले. दक्षता पथकाने चौकशी करून अहवाल सादर केल्यानंतरही दोषी आढळलेल्या अभियंत्यावर बदली खेरीज कारवाई होत नाही असे निदर्शनास आल्यानंतर आ. चरणभाऊ वाघमारे यांनी दि. 24 जानेवारी 2017 रोजी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे वस्तुस्थिती कथन करून कारवाईला होत असलेल्या विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली.
साबांच्या लालफितशाहीचा फटका आमदारांच्या या तक्रारवजा पत्रालाही बसला. 24 जानेवारी 2017 रोजी आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेले हे पत्र दुसर्‍या दिवशी मुख्यमंत्री कार्यालयाला प्राप्त झाले असले तरी या पत्राच्या संदर्भाने कार्यवाही करण्यास सार्वजनिक बांधकाम प्रशासनाला उणे पुरे एक वर्ष लागले. जानेवारी 2017 च्या त्या पत्रावर साबां प्रशासनांकडून तब्बल वर्षानंतर म्हणजे 16 फेब्रूवारी 2018 रोजी कार्यवाही झाली. आ. चरणभाऊ वाघमारे यांच्या 2017 मधील जानेवारीच्या या पत्रावर फेब्रूवारी 2018 मध्ये कारवाई करण्यास मुहूर्त काढला गेला यावरून साबां प्रशासनात असलेली मिलीभगत चव्हाट्यावर आली आहे.
दरम्यान मध्य मुंबईतील कार्यकारी अभियंता स्वप्ना कोळी आणि ए. जे. पाटील यांच्या भ्रष्ट कारभारामुळे आयुष्याची कमाई साबांच्या कंत्राटी कामात खर्ची घातलेल्या तीन कंत्राटदारांना आपले आयुष्य संपविण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचा आरोप अलिकडेच आत्महत्या केलेल्या युवराज जगदाळे यांच्या कुटूंबियांनी केला आहे. (क्रमशः)