Breaking News

महिलांनी आपल्या अधिकारांची जाणीव करून यश गाठावे : जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार

बुलडाणा,(प्रतिनिधी): महिला आता समाजातील प्रत्येक क्षेत्रात नेत्रदिपक प्रगती करीत आहे. त्यांच्या प्रगतीला समाजानेही सलाम केला आहे. ज्या महिलांनी यश गाठले आहे, ज्या यशाच्या शिखरावर आहे, त्यांनी समाजासाठी आदर्शवत कामगिरी केली आहे. महिलांनी आपल्या अधिकाराची जाणीव करून घ्यावी व यश गाठावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज केले. 

जागतिक महिला दिनानिमित्त सहस्त्रक महिला मतदार, उत्कृष्ट काम करणार्या महिला अधिकारी व कर्मचारी, तसेच दोन व एक मुलीवर कुटूंब नियोजन शस्त्रक्रीया करणार्या महिलांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती सुरेखा कोसमकर, मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप डोईफोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, सह दिवाणी न्यायाधीश शै. अ बाफना, महिला व बालविकास अधिकारी प्रमोद येंडोले, उपजिल्हाधिकारी राजेश देशमुख आदी उपस्थित होते.
समाजात महिलांना दुय्यम स्थान देण्याच्या विचार आता इतिहासजमा झाला असल्याचे सांगत जिल्हाधिकारी श्री. पुलकुंडवार म्हणाले, महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी सर्वात आधी हा विचार सोडून द्यावा लागेल. आता महिलांनीच महिलांच्या अधिकाराबाबत सजग होवून स्त्री भृण हत्या प्रकाराला समाजातून दूर न्यावे. स्त्री भृण हत्या रोखण्यासाठी समाजाने आपली मानसिकता बदलावी. वंशाचा दिवा केवळ मुलगाच बनू शकतो, असे नाही तर मुलीही वंशाला पुढे नेत आहेत. महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती सुरेखा कोसमकर म्हणाल्या, 8 मार्च 1908 मध्ये अमेरिकेतील न्युयॉर्कमध्ये स्त्री शक्ती रस्त्यावर उतरली. तेव्हापासून 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महिलांनी स्वत:ला ओळखावे, पुरूषांनी महिलांना प्रगतीमध्ये हातभार लावावा, तसेच महिलांनी आपल्या सुप्त गुणांना वाव द्यावा. जेणेकरून महिलाही मोठ्या संख्येने विविध क्षेत्रात पुढे येत आपली प्रगती करतील. विधी सेवा प्राधिकरण गरजूंना विनाशुल्क विधी सेवा देतात. त्यामुळे महिलांनी विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा.
प्रास्ताविक सह दिवाणी न्यायाधीश बाफना यांनी केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पंडीत यांनी आपले विचार मांडले. संचलन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती रेवती देशपांडे व आभार प्रदर्शन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी येंडोले यांनी केले. कार्यक्रमादरम्यान वयाची 18 वर्ष पूर्ण करून सहस्त्रक मतदार असलेल्या स्त्री मतदारांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये पायल संजय गवई, समृद्धी प्रकाश सातव, राखी गजानन शिरसाट व दिपाली शिवाजी जुमळे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणार्या महिला अधिकारी व कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच एक व दोन मुलींवर कुटूंब नियोजन शस्त्रक्रीया करणार्या महिला कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला महिला अधिकारी, कर्मचारी आदींसह महिला उपस्थित होत्या.