Breaking News

पल्स पोलिओ मोहिमेचा जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते शुभारंभ

सातारा, दि. 30  (प्रतिनिधी) : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेच्या पहिल्या सत्राचा शुभारंभ जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र  नागठाणे येथे बालकांना डोस पाजून करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, आरोग्य विभागाचे सह संचालक आर.  सी. चौगुले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनीत फाळके, माता  बाल संगोपन अधिकारी डॉ. सचिन पाटील उपस्थित होते.
मुद्गल म्हणाले, सर्व आरोग्याच्या मोहिमेमध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम ही सर्वात यशस्वी मोहिम आहे. या मोहिमेमुळे भारतातून पोलिओ आजाराचे संपूर्ण  उच्चाटन होणार असून त्यासाठी 5 वर्षाच्या आतील बालकांना पोलिओचा डोस पाजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. चुकून एखाद्या बालकास पोलीओ डोस देणे  राहिले असल्या त्यास नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या ठिकाणी डोस पाजून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या मोहिमेच्या अनुषंगाने 2 लाख 65 हजार 114 बालकांना पोलिओचे डोस देण्यात येणार आहे. यासाठी 2 हजार 449 बुथची स्थापना करण्यात आली आहे.  त्याचसोबत एकूण 134 ट्रान्झिट बुथ (रेल्वे स्टेशन, बसस्टॅन्ड, टोलनाके) व 171 मोबाईल बुथ विट भट्या, बांधकामावरील कामगार, ऊसतोड या सवर्र् ठिकाणी  पल्स पोलिओचे डोस देण्यात आले असून त्यासाठी 6 हजार 36 कर्मचारी काम करत आहे.