Breaking News

पवनी वनपरिक्षेत्रात बिबट्या मृतावस्थेत आढळला

नागपूर  - उमरेड-क-हांडला अभयारण्यातील पवनी वनपरिक्षेत्रात आज, बुधवारी एका बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहीती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सदर बिबट्याच्या मानेवर तसेच पायावर जखमा आढळून आल्याने दोन प्राण्यांच्या झुंजीत या बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. 


पवनी वनपरिक्षेत्रातील मृत मादी बिबट्याचे वय 4 ते 5 वर्षांचे असून दोन दिवसांपूर्वी या बिबटाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. इतर सर्व अवयव व्यवस्थित आढळून आले आहेत. या बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले असून यावेळी त्याच्यावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले आहेत. यावेळी भंडा-याचे मानद वन्यजीव रक्षक राजकुमार जोब, सीट संस्थेचे शाहीद खान, स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. येनापुरे आणि डॉ. बारापात्रे यावेळी उपस्थित होते. बिबट्याशी संबंधीत इतर नमुने न्याय वैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पुढे पाठ विण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वी नागपूर नजीकच्या खापरी गावा जवळ मादी बिबट आणि शावकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. वाघांच्या मृत्यूच्या चर्चा होत असतानाच नागपूर जिल्हातील वनक्षेत्रात बिबट्यांच्या मृत्यूच्याही एका मागोमाग घटना घडल्या आहेत. त्यामुळे वन्यजीव प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.