Breaking News

बिबट्याला पकडण्यासाठी मृत शेळी!


लोणी / प्रतिनिधी - बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने लावलेल्या पिंज-यात चक्क मृत शेळी ठेवण्यात आली. दुर्गापूर परिसरात बिबट्याची दहशत मात्र काही केल्या संपायला तयार नाही. बिबट्याने यापूर्वी येथील बाळासाहेब पुलाटे यांच्यावर केलेला हल्ला ताजा असतांनादेखील वनविभाग अद्यापही झोपेतच आहे. 

येथील एकनाथ रजपुत आणि सोमनाथ पुलाटे या दोन युवकांवर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु सुदैवाने त्यांना काही इजा झाली नाही. दुर्गापूर येथील बिरोबा मंदीर परिसरात सध्या नर-मादीसह बिबट्यांची पिल्ले आढळून आली आहेत. बिबट्याने केलेल्या हल्यानतंर वनविभागाने या भागात पिंजरा लावला. पण त्यामध्ये चक्क मेलेली शेळी ठेवल्यामुळे गेल्या चार ते पाच दिवसांपासून पिंजरा लावूनही याकडे बिबट्या फिरकलाच नाही. सध्या या भागात चारा काढणे, पिकांना पाणी देणे, पिकांची काढणी आदी कामे या भागातील शेतकरी जीव मुठीत धरुन कामे करत आहेत. मेलेली शेळी ठेऊन वनविभागाने त्यांचे काम केले असले तरी शेतक-यांना मात्र बिबट्याचे दर्शन दररोज घडत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी प्रचंड धास्तावले आहेत.