Breaking News

कष्टाळू वयोवृद्ध मातांचा सन्मान प्रेरणादायी : विखे


लोणी प्रतिनिधी - घरातील महिला पडद्यामागे राहून कुटुंबाची प्रगती साध्य करतात. कुटूंबासाठी झटणाऱ्या या आदर्श मातांच्या योगदानामुळेच कुटुंबव्यवस्था टिकून आहे. परिस्थितीची जाणीव ठेवून कुटूबांच्या प्रगतीसाठी कसोशिने कष्ट घेणार्‍या मातांचा केला जाणारा गौरव प्रेरणादायी ठरतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी केले. 

लोणी बुद्रूक येथे रणरागिणी महिला मंडळाच्यावतीने गावातील ७५ वर्षांच्या पुढील महिलांचा गौरव अहमदनगर जिल्हा परिषदेच्‍या अध्यक्षा विखे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सिंधुताई विखे, धनश्री विखे आदींसह मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या. यावेळी सिंधुताई विखे, लोणीच्या माजी सरपंच अनुसया बिडवे, माजी प्राचार्या प्रभावती आदींसह अनेक वयोवृध्द महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या कविता लहारे, वंदना तुरकणे, सुप्रिया विखे, कविता तोडमल, अनिता निमसे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना विखे म्हणाल्या, एकीकडे सोशल मिडियावर इतके आपण प्रभावित झालो आहोत, की कुटुंबातील संवादच संपल्यात जमा आहे. पण याही परिस्थितीत सर्व कुटुंबातील सदस्यांना एकत्रित आणून संवाद घडविण्याचे मोठे सामर्थ्य हे घरातील ज्येष्ठांमध्ये असते. एक पिढी घडविताना असलेल्या आव्हानांना सामोरे जात कुटुंबाला यशस्वी वाटेने नेणाऱ्या मातांच्या योगदानाची ही कृतज्ञता आहे. याप्रसंगी झालेल्या सन्मानाने ज्येष्ठ मातांच्या चेहर्‍यावरील आनंद द्विगुणित झाला. कार्यक्रमास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.