मार्केटयार्ड चौकात खड्डेच खड्डे; ठेकेदाराचे अक्षम्य दुर्लक्ष
नगर-महामार्गावरील मार्केटयार्ड चौकात मोठमोठे खड्डे पडले आहेत. बंगालचौकी परिसराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या सुरुवातीलाच हे खड्डे पडले आहेत. नगर औरंगाबाद महामार्गावरील हे खड्डे संबंधित ठेकेदाराला का दिसत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
नगर-औरंगाबाद या महामार्गावर अवजड वाहतुकीसह दुचाकी वाहने, एसटी, जीप, रिक्षा आदी अनेक प्रकारच्या वाहनांची सतत वर्दळ सुरु असते. रात्रीच्या वेळी या महामार्गावर अनेक ठिकाणी पथदिवे बंद आहेत. त्यामुळे हे खड्डे दिसत नाहीत. या महामार्गाची संबंधित ठेकेदाराकडून वेळोवेळी डागडुजी सुरु असते. मात्र या ठेकेदाराचे मार्केटयार्ड चौक, कोठी चौक, चांदणी चौक, जीपीओ चौक, कोठला परिसर, नटराज चौक, डीएसपी चौक, मुकुंदनगर चौक आदी ठिकाणच्या खड्ड्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. हे खड्डे चुकवितांना अनेकवेळा छोटे मोठे अपघात झाले आहेत. काहींना जीव गमवावा लागला आहे.
या खड्ड्यांमुळे पोलीस कर्मचारी, निवृत्त शिक्षक, महाविद्यालयीन विद्यार्थी, वयोवृद्ध महिला आदी मृत्युमुखी पडले आहेत. या महामार्गावर झालेल्या अपघातात काहींना कायमचे दिव्यंगत्व आले आहे. संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यापूर्वी अनेकांनी केली आहे. मात्र याचे पुढे काय झाले, याविषयी सारेच अनभिज्ञ आहेत. दरम्यान, या महामार्गावरील खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात आले नाही तर राष्ट्रवादीच्यावतीने उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा केडगाव, भिंगार आदी ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.