दुचाकींच्या धडकेत अकोलेचे बराते ठार; एक जखमी
तालुक्यारतील खांडगाव ते निमगाव पागा रस्त्यावर निमज शिवारातील भोकनळ वस्ती परिसरात बुधवारी रात्री साडे सात वाजेच्या अपघात झाला. दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गंगाराम पाटीलबा बराते {वय. ४०, रा. वाघापूर, ता. अकोले} असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याचप्रमाणे ऋतिक परसराम गुंजाळ {रा. खांडगाव, ता. संगमनेर} हा अपघातात गंभीर जखमी झाला. त्याच्यावर नाशिक येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
गंगाराम बराते हे अकोले तालुक्यातील वाघापूर येथील रहिवासी होते. दोन दिवसांपुर्वी त्यांनी नवीन ट्रॅक्टर घेतला होता. त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याकरिता ते मोटारसायकलहून संगमनेरात आले होते. मित्राचे नातेवाईक आजारी असल्याने मित्र संगमनेरात थांबल्याने ते एकटेच निमगाव पागा मार्गे वाघापूरकडे निघाले होते. निमज शिवारातील भोकनळ वस्ती परिसरात आले असता त्यावेळी खांडगावकडे निघालेल्या ऋतिक गुंजाळ व गंगाराम बराते यांच्या मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात बाराते यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ शहरातील खासगी रूग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. मयत बराते हे वाघापूर गावचे माजी सरपंच भाऊसाहेब बराते यांचे सख्खे बंधू होते. त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली. त्यांच्या पार्थिवावर गुरूवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडिल असा परिवार आहे.