Breaking News

सरकारने लोकशाहीचा गळा दाबला

मुंबई : कोरेगाव भीमा प्रकरणी मिलिंद एकबोटे यांना अटक झाल्यानंतर संभाजी भिडे यांना अटक होईल असे वाटले होते. मात्र, भिडे यांना अटक झाली नाही. त्यामुळे जनतेत प्रचंड असंतोष आहे. त्यासाठी 26 मार्चला मोर्चा काढण्यात येणार असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. या मोर्चाला परवानगी न देता सरकारने लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम केले, अशी घणाघाती टीका त्यांनी सरकारवर केली आहे. सोमवारी निघणार्‍या मोर्चावर पोलिसांनी बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली.

कोरेगाव भीमा घटनेनंतर राज्यातील अलुतेदार, बलुतेदार प्रचंड संतप्त आहेत. यामुळे सरकारला हा मोर्चा निघूच नये, असे वाटत होते. असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर केला.पोलिसांनी शाळकरी मुलांच्या परीक्षा आहेत, असे कारण दाखविले. मात्र, दहावी व बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत. आम्ही शांततेत आणि एकाच ठिकाणावरून मोर्चा काढणार होतो, पण पोलिसांनी मोर्चा उधळून लावला आहे, अशी टीका आंबेडकरांनी केली. 
मोर्चेकरी राज्यभरातून निघाले आहेत. सोमवारी सकाळी 11 वाजता सीएसटी येथे सर्व मोर्चेकरी जमून एल्गार करतील. पोलिसांच्या बंदीमुळे मोर्चात सहभागी होणार्‍यांची संख्या वाढणार आहे. मला तसे फोन येत आहेत, आता मागे वळून बघायचे नाही, अशी सर्वांची भावना आहे, असे आंबेडकर म्हणाले.
यावेळी काही गोंधळ झाल्यास त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, अशी भूमिका एल्गार मोर्चाचे प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली. मोर्चाला थांबवणे सरकारच्या आवाक्याबाहेर असल्याचेही त्यांनी म्हटले. एल्गार मोर्चात सीएसटीला भारिप बहुजन महासंघासह संभाजी बिग्रेड, मराठा महासंघ, धनगर टायगर फोर्स, ओबीसी, माळी आणि लिंगायत संघटनांनी सहभाग घेतला आहे. यामुळे मोठ्या संख्येने लोक रस्तावर उतरतील, अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.