Breaking News

दखल - तेव्हा मलिकनेर आता जाधवांचा खांदा!

महाराष्ट्राच्या प्रशासकीय इतिहासात सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यशैली एका वेगळ्या अर्थाने बदनामीच्या उंचीवर आहे. महसुल आणि पोलीस या दोन खात्यात सुरू असलेल्या नियमीत भ्रष्ट कार्यशैलीला तोंडात बोट घालायला लावणारा सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार तत्कालीन मंत्र्यांना बदनाम करण्यात कुठलीच कसूर सोडत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचा पंधरा वीस वर्षाचा कारभार पाहिल्यास या विभागातील एका विशिष्ट लॉबीने आपल्या खात्याच्या मंत्र्यांना बदनाम करण्यासाठी मंत्र्यांच्या आप्त मंडळींचा कुशलतेने वापर केल्याचे दिसते. थेटच सांगायचे झाले तर छगन भुजबळ यांना बदनाम करण्यासाठी मलिकनेरचा खांदा वापरला गेला तर चंद्रकांत दादा पाटील यांना बदनाम करण्यासाठी श्रीनिवास जाधव यांचा खांदा वापरला जात आहे. किशोर पाटील, रणजीत हांडे, प्रज्ञा वाळके आणि या लॉबीचे मार्गदर्शक अरविंद सुर्यवंशी या मंडळींचे कारनामे साबांच्या प्रतिष्ठेला कलंकीत करीत आहेत.

ताकाला जाऊन भांडे लपविण्यात काही हशील नाही. आग लागल्यानंतर धुर निघण्याची प्रक्रीया थांबवणे अवघड आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यात सुरू असलेला अपहार, अ नियमितता, भ्रष्टाचार प्रशासकीय शिष्टाचार झाला आहे. ही बाब कुणी कितीही नाकारण्याचा प्रयत्न केला तरी वास्तव लपवणे साबांच्या अखत्यारीत आता राहिले नाही. भ्रष्टाचाराचा कोंबडा झाकून ठेवला तरी चौकशीचा आरव सत्याचा सुर्य उजळल्याशिवाय रहात नाही हे गेल्या वर्ष दोन वर्षाच्या घडामोडींवरून उघड झाले आहे.
महाराष्ट्राच्या ग्रामिण भागात कार्यरत असलेल्या साबां यंत्रणेत झालेला भ्रष्टाचार एखाद्या वेळेला दुर्लक्षित झाला तर मान्य होऊ शकते मात्र राज्याचा कारभार ज्या इमारतीतून चालतो, त्या मंञालयात दिवसरात्र जागृत चलबिचल सुरू असतांना शेकडो कोटींची परस्पर विल्हेवाट पाच पंचवीस वर्षात लावली गेली, त्याची खबर अनेक वर्ष प्रसार माध्यमांना लागू न देता मंत्रालयाची देखभाल दुरूस्तीचा कारभार पाहणार्‍या शहर इलाखा साबां विभागाने शासनाची दिशाभूल केली. सन 2010 ते 2017 या कार्यकाळात या ठिकाणी कार्यरत असलेल्या कार्यकारी अभियंत्यांनी केलेल्या अनेक गैरव्यवहारांची चौकशी झाल्यानंतर ही मंडळी उघड्यावर पडली. किशोर पाटील यांच्या विरूध्द देयके अदा करण्यासाठी लाच मागीतली म्हणून एसीबीकडे तक्रारही दाखल आहे. रणजीत हांडे यांनी छगन भुजबळ यांना क्लीन चीट अहवाल देतांना केलेली हात चलाखी सर्वश्रूत आहे. 2014 मध्ये स्वातंत्र्य दिन सोहळा करण्यासाठी मंत्रालयात पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या प्रकरणातही रणजीत हांडे यांच्याकडे संशयाने पाहीले जात आहे. प्रज्ञा वाळके यांच्या कामाची तर सर्वदूर निर्भत्सना होत आहे. मंत्रालय असो नाही तर आमदार निवास, उंदीर मारणे असो नाही तर मंत्रालयातील डेब्रीज प्रत्येक कामात त्यांची हात सफाई साबांच्या प्रतिष्ठेला डाग लावीत आहे. सर्वात खेदाची बाब म्हणजे या तिन्ही कार्यकारी अभियंत्यांनी शहर इलाखा साबांत दाखवलेल्या भ्रष्ट कुशलतेचे सर्व पुरावे हातात असूनही संरक्षण देण्यात अग्रेसर असलेले अधिक्षक अ भियंता अरविंद सुर्यवंशी हे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची दिशाभूल करीत आहे. छगन भुजबळ यांची दिशाभूल करतांना मलिकनेर यांचा खुबीने वापर या चौकडीने केला. यावेळी चंद्रकांत दादा यांच्यासाठी त्यांचे खासगी स्वीय सहाय्यक श्रीनिवास जाधव यांच्या खांद्यावरून निशाणा लावला जात आहे. तात्पर्य इतकेच की महाराष्ट्र साबांत केपी तथा किशोर पाटील, रणजीत हांडे, प्रज्ञा वाळके आणि अरविंद सुर्यवंशी ही लॉबी एका वेगळ्या अर्थाने चर्चेत आहे. आजपर्यंतचे चर्चेत आलेले कुठलेही प्रकरण या चौघांच्या नावाचा उल्लेख झाल्याशिवाय संपत नाही, यातच सारे काही आले.