Breaking News

प्‍लॅस्टिक सर्जरी शिबिरास भरीव सहकार्य : माजी आ. कदम


साईबाबांनी सुरु केलेले रुग्‍णसेवेचे कार्य अनमोल आहे. त्यांचा आदर्श घेत आयोजित करण्यात आलेल्या मोफत प्‍लॅस्टिक सर्जरी शिबिरास पुढील काळात साई संस्‍थानच्यावतीने भरीव सहकार्य दिले जाईल, अशी ग्‍वाही संस्‍थानचे उपाध्‍यक्ष, माजी आ. चंद्रशेखर कदम यांनी दिली.

साईबाबा समाधी शताब्‍दीच्या निमित्ताने साई संस्‍थान, ‘गिव्‍ह मी फाईव्‍ह’ फाऊंडेशन. औरंगाबाद आणि असोसिएशन ऑफ प्‍लॅस्टिक सर्जन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने मोफत तीन दिवसीय प्‍लॅस्टिक सर्जरी शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी कदम बोलत होते.

यावेळी संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, विश्‍वस्‍त भाऊसाहेब वाकचौरे, उपजिल्‍हाधिकारी मनोज घोडे पाटील, माजी विश्‍वस्‍त सुरेश वाबळे, उपवैद्यकीय संचालक डॉ. विजय नरोडे, वैद्यकीय अधिक्षिका डॉ. मैथिली पितांबरे, औरंगाबाद येथील प्‍लॅस्‍टीक सर्जन डॉ. राम चिलगर, सारंग देशमुख आदींसह परदेशातून आलेले तज्ञ डॉक्‍टर, संस्‍थानचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व रुग्‍ण आणि त्‍यांचे नातेवाईक उपस्थित होते.या शिबिरात जीवन सुसह्य करणा-या शस्‍त्रक्रिया करण्‍यात आल्‍या. शिबिरात सुमारे १०० रुग्‍णांनी सहभाग नोंदवला होता. यापैकी ७७ रुग्‍णांवर यशस्‍वीरित्‍या शस्‍त्रक्रिया करण्‍यात आल्‍या. उर्वरित २३ रुग्‍णांवरदेखील येत्‍या शनिवारी डॉ. राम चिलगर यांच्‍या उपस्थितीत शस्‍त्रक्रिया करण्‍यात येणार आहे. 

या प्रसंगी मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, विश्‍वस्‍त भाऊसाहेब वाकचौरे आदींची भाषणे झाली. या शिबिरात मोलाचे योगदान देणा-या परदेशातील तज्ञ डॉक्‍टरांचा, वैद्यकीय अधिका-यांचा व कर्मचा-यांचा संस्‍थानच्‍यावतीने सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाचे प्रस्‍ताविक वैद्यकीय अधिक्षिका डॉ. मैथिली पितांबरे यांनी केले. सूत्रसंचालन विकास शिवगजे यांनी केले. डॉ. रजनी साबळे यांनी आभार मानले.