Breaking News

कार्ती चिदंबरम यांना सीबीआयकडून अटक आयएनएक्स मीडिया प्रकरण


नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम याला बुधवारी आयएनएक्स मीडिया प्रकरणासंदर्भात सीबीआयने अटक केली. कार्ती चिदंबरम आज सकाळी लंडनहून चेन्नई परतताच त्यांना सीबीआयने विमानतळाहून अटक केली. कार्ती चिदंबरम यांचे सनदी लेखापाल एस. भास्कररमण यांनाही यापूर्वी अटक करण्यात आली होती. ते सध्या पोलिस कोठडीत आहेत. सक्तवसुली संचालनालयाकडून त्यांची चौकशी सुरू आहे. 

याआधीही कार्ती यांच्या घरावर आणि कार्यालयांवर अनेकदा सीबीआयनं छापे टाकले आहेत. आयएनएक्स मीडियाला परदेशातून पैसे मिळवता यावे, यासाठी एफआयपीबी या सरकारी संस्थेकडून परवानगी मिळाली होती. त्यावेळी चिदंबरम गृहमंत्री होते. याचाच फायदा घेऊन कार्तीने परदेशातून पैसे घेतले, आणि पैशांचा गैरव्यवहार केला, असा त्यांच्यावर आरोप आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार या प्रकरणासंदर्भात चौकशीसाठी ते सीबीआयला सहकार्य करत नव्हता. त्यामुळे त्यांना ही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पी. चिदंबरम हे सध्या लंडनमध्ये आहेत. पण मुलाच्या अटकेची बातमी मिळताच ते भारतात येण्यासाठी रवाना झाले आहेत. कार्ती चिदंबरम यांनी आयएनएक्स मी डिया विरोधात चालू असलेल्या कर चौकशीत हस्तक्षेप करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आयएनएक्स मीडियाकडून 10 लाखाची लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने त्याला अटक केली आहे.