Breaking News

ई- लिलाव प्रणालीचा शेतकऱ्यांना थेट फायदा


संगमनेर/प्रतिनिधी - केंद्रशासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या शेतमालाच्या खऱेदी-विक्रीसाठी कृषि व शेतकरी कल्याण विभागामार्फत राष्ट्रीय कृषि बाजार संगणीकृत लिलाव पध्दतीने ई- ऑप्शन कार्यान्वित केले आहे. त्याचे कामकाज ई-ट्रेडींग प्लॅटफॉर्मद्वारे सुरू आहे. संगणकीकृत लिलाव पद्धतीस गती येत असून या बाजार समितीमध्ये डाळिंब आणि भुसार या शेतमालाची ई-लिलावाद्वारे खरेदी करण्यात येत आहे. या प्रणालीमुळे खरेदी-विक्रीची व्यवहार सुलभ होऊन याचा शेतकऱ्यांना थेट फायदा होत आहे.

बाजार समित्यामध्ये ई लिलाव द्वारे खरेदी विक्रीचे व्यवहार व्हावे, या उद्देशाने कृषि पणन मंत्रालयाने राज्यातील ३० बाजार समित्यांमध्ये ई-लिलावाद्वारे शेतीमालाची खरेदी विक्री करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यात संगमनेर बाजार समितीचा समावेश आहे. ई-लिलाव प्रणालीबाबत शासनाने आखून दिलेल्या मुदतीत बाजार समितीत ई लिलाव यंत्रणा कार्यान्वित करुन सुरवातीला भुसार या नियमित शेतीमालाचे प्रायोगिक तत्वावर ई लिलाव सुरु करण्यात आले आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या व व्यापाऱ्यांच्या उत्तम प्रतिसादानंतर डाळिंब या नियमित शेतीमालाची ई-लिलावाद्वारे खरेदी सुरु करण्यात आली. ई लिलाव प्रणालीमध्ये प्रतवारी करुनच लॉट पाडले जातात. जेणेकरुन प्रतवारी केलेल्या मालाला उच्च दर्जाचा बाजारभाव मिळेल. ई लिलाव प्रणालीमध्ये शेतीमालाला किती भाव मिळाला, याची शेतकऱ्यांना ऑनलाईन माहिती मेसेजद्वारे मिळणार आहे. यामुळे आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यास शेतकरी आपला शेतमाल देण्यास संबधित आडत्याला नकार देऊ शकतो. या ई लिलाव प्रणालीमुळे घरबसल्या स्वत:च्या शेतीमालाची किंमत विक्री किंमत, वजन आदी सर्व माहिती मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी सजग राहण्याची गरज आहे, असे सभापती शंकरराव खेमनर व उपसभापती सतिषराव कानवडे यांनी सांगितले. या ई-प्रणालीचा फायदा जास्तीत जास्त जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन बाजार समितीच्यावतीने करण्यात आले आहे.