Breaking News

‘एमपीएससी’ डमी विद्यार्थी प्रकरण; विरोधकांचा सभात्याग


मुंबई : राज्यातील एमपीएससी परीक्षेत डमी लोक बसवण्याचे मोठे रॅकेट असून याबाबतचा स्थगन प्रस्ताव मांडला गेला. मात्र, सरकारने हा स्थगन प्रस्ताव फेटाळल्यामुळे आम्ही सरकारचा निषेध करत सभात्याग केल्याची माहिती विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी दिली. लाखो तरुण एमपीएससीची परीक्षा देत असतात. गोरगरीब घरातील मुले जवळजवळ दरवर्षी 8 ते 10 लाख परीक्षा देत असतात. या परिक्षेमध्ये काही लोक डमी उमेदवार बसवत आहेत. त्या डमी उमेदवाराच्या माध्यमातून पास होवून शासकीय सेवेत दाखल होतात. हे 2015-16पासून घडत असणारी प्रक्रिया योगेश जाधव नावाच्या तरुणाने उघडकीस आणली. योगेश जाधव या विद्यार्थ्यांने याबाबत अडीच हजार मेल पंतप्रधान मोदी यांना पाठवले आहेत. याची दखल महाराष्ट्र सरकार घेत नव्हते. 2015 दरम्यान सुरु झालेली या प्रक्रियेनंतर एफआयआर 16 जुन 2016 ला दाखल करण्यात आला. त्याच्यावर आता एसआयटी करावी लागली. आजही महाराष्ट्रात 200 डमी बसणारे उमेदवार मोकळे फिरत आहेत. एसआयटीच्या म्हणण्यानुसार 16 जणांना अटक केलेली नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रातील युवकांमध्ये फार मोठा असंतोष या सरकारबद्दल निर्माण झाला आहे. जे लोक वाममार्गाने डमी उमेदवार बसवून पास होवून सरकारी सेवेत आहेत अशांची संख्या जवळपास हजार दीड हजाराच्या घरात आहे आणि 200 लोकं असे आहेत जे डमी म्हणून बसण्याचे काम करत आहेत. या आकडयामध्ये वाढही होवू शकते असेही जयंत पाटील म्हणाले.
हे प्रकरण बाहेर काढणार्‍या योगेश जाधव याच्यावर प्राणघातक हल्लाही करण्यात आला आहे. आता नांदेडच्या पोलिसांनी त्याला संरक्षण दिले आहे. असे असताना सरकार एमपीएससीच्या परीक्षा पारदर्शक करत नाही. एमपीएससीच्या परीक्षा पारदर्शक व्हाव्यात, बायोमॅट्रीक पध्दतीने व्हाव्यात अशा मागण्या तरुण करत आहेत. याकडे सरकारचे लक्ष नाही. डमी उमेदवार आहेत त्यांना अटक करण्यात येत नाही. काल पाच-सहा जणांना अटक झाली. हे असंच सत्र सुरु राहिलं तर महाराष्ट्रातल्या गोरगरीब घरातील मुलांना एमपीएससीच्या परीक्षेला बसण्याची इच्छा राहिल का? हाच खरा प्रश्‍न आहे. म्हणून आज विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला. यावर सरकारने चर्चा करावी अशी आमची मागणी होती. निवेदन करावे असेही आम्ही सांगितले परंतु आमचा प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळला त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि सर्वच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारचा निषेध करत सभात्याग केला.