Breaking News

विकास आराखड्याच्या निधीची जबाबदारी पार पाडू : काळे

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामसेवकांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून विकास कामांचा आराखडा तयार करावा. तालुक्यातील कोणतेही विकासकामे निधीअभावी रखडू देऊ नका. निधी कमी पडत असल्यास जिल्हा परिषद व शासनाकडून तात्काळ निधी आणायची जबाबदारी सक्षमपणे पार पाडू, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आशुतोष काळे यांनी केले.  

जिल्हा परिषद चांदेकसारे गटाच्या प्रभाग समितीची बैठक नुकतीच पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. जि. प. सदस्या सोनाली रोहमारे अध्यक्षस्थानी होत्या. काळे म्हणाले, उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. कोपरगाव तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी पाणी टंचाई आहे, त्या त्या गावातील ग्रामविकास अधिका-यांनी तातडीने पाण्याच्या टँकरचे प्रस्ताव पाठवावेत. शिक्षण, आरोग्य, कृषी, बांधकाम व महिला बालकल्याण विभागाच्या अधिका-यांनी आपापसात समन्वय ठेऊन विकासकामांचा पाठपुरावा करावा. त्यामुळे जनतेच्या समस्या तातडीने सुटून विकासकामांना गती मिळेल. प्रत्येक अधिका-यांनी मिटिंग घेऊन कामाची जबाबदारी निश्चित करावी. घरकुल, दलितवस्ती सुधार योजना, लसीकरण मोहीम नळ पाणी योजना मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करा. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य अभ्यासू असून अधिका-यांची उडवाउडवीची उत्तरे खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला. 

यावेळी जिल्हा परिषद चांदेकसारे गटाच्या सदस्या रोहमारे म्हणाल्या, अधिका-यांनी प्रत्येक कामाचे महत्त्व जाणून प्राधान्याने विकास कामांचे प्रस्ताव तयार करावेत. विकासकामे मार्गी लावावीत. तयार केलेल्या विकासकामांच्या प्रस्तावाची माहिती दिल्यास पाठपुरावा करणे सोपे होईल. 

याप्रसंगी पंचायत समिती सभापती अनुसया होन, जि. प. सदस्या सोनाली रोहमारे पं. स. सदस्य बाळासाहेब राहाणे, राहुल रोहमारे, रोहिदास होन, प्रशांत वाबळे, बाबुराव थोरात, सचिन आव्हाड, ज्ञानेश्वर गव्हाणे, गंगाधर खोमणे, वसंतराव पाचोरे, विठ्ठल जावळे, अशोक डांगे, के. डी. खालकर, सोपानराव आभाळे, योगीराज देशमुख, योगेश खालकर, मधुकर औताडे, राजेंद्र औताडे, पंकज पुंगळ, मतीन शेख, पंचायत समितीचे अधिकारी गोंदके, वागिरे, माळी, शबाना शेख, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, पशुसंवर्धन, बांधकाम व शिक्षण विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.