Breaking News

‘ओपन आयडियाज’ डिझाईन स्पर्धेमधील विजेत्यांना पुरस्कार प्रदान

पुणे -  स्मार्ट सिटीच्या ‘ओपन आयडियाज’ डिझाईन स्पर्धेची सांगता 7 मार्च 2018 ला झाली. या स्पर्धेतील ब्रिक्स ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या सर्व महिला सदस्य असलेला संघ विजेता झाला असून पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने ओटा मार्केट्ससाठी फ्ली सेल्फ-हेल्प आणि ग्रुप मार्केटस या संकल्पनेवर आधारित डिझाईनचा प्रस्ताव पुणे परिसरातील आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून ‘ओपन आयडियाज’ स्पर्धेमधील सहभागाच्या माध्यमाने मागविला होता. 

उदयोन्मुख वास्तुविशारदांना (आर्किटेक्ट) या प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळेल अशी घोषणाही करण्यात आली होती. या ओटा मार्केट्सकरिता पुणे स्मार्ट सिटीने औंध-बाणेर-बालेवाडी परिसरातील काही जागा निवडल्या होत्या. त्या जागा सामाजिक सुविधा म्हणून विकसित करण्यात येतील, तसेच त्या ठिकाणी विक्रेत्यांसाठी नीटनेटक्या, उत्कृष्ट संरचना केलेल्या सुविधा पुरवण्यात येतील. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, वास्तुरचनाशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी नोंदणीसाठी त्यांची नावे व तपशील, महाविद्यालयात शिकत असल्याचा पुरावा (बोनाफाईड सर्टिफिकेट), मार्गदर्शकाचे नाव आणि इतर माहिती पाठवली होती.ओपन आयडिया डिझाईन स्पर्धा ही पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने 10 जानेवारी 2017 रोजी घोषित केली होती. यामध्ये वास्तुरचनाशास्त्राच्या 15 महाविद्यालयांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यानंतर पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने 1 फेब्रुवारी 2018 रोजी एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये डिझाईनमध्ये अपेक्षित बाबी आणि डिझाईन पाठविण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या सात संघांनी या स्पर्धेमध्ये 25 फेब्रुवारीपूर्वी आपली वेगवेगळी डिझाईन सादर केली. त्यानंतर सर्व संघांना त्यांच्या डिझाईनचे सादरीकरण करण्यासाठी स्मार्ट सिटीच्या पंचांच्या वतीने औंध वॉर्ड कार्यालयात पाचारण करण्यात आले. सर्व संघांनी त्यांचे डिझाईन पंच समितीपुढे सादर केले. या सादरीकरणानुसार पंचांनी डिझाईनचे मूल्यांकन केले आणि विजेते आणि उत्तेजनार्थ बक्षिसांसाठी अंतिम निवडींची घोषणा केली.