मालपाणी परिवाराने साकारले अत्याधुनिक योग ; निसर्गोपचार केंद्र! शनिवारी होणार उदघाटन
औषधी घेऊन आजारावर केवळ नियंत्रण मिळवता येते, आजारातून मुक्ती मिळत नाही. मात्र योग व निसर्गोपचार पद्धतीने आजारातूनच पूर्णत: मुक्ती मिळवता येणे शक्य आहे. यासाठी शिक्षण प्रसारक संस्थेने मालपाणी परिवाराच्या सहयोगातून या उपचार पद्धतीचे अत्याधुनिक केंद्र उभारले आहे. येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास बत्तीस प्रकारच्या व्याधींवर प्रभावीपणे निसर्गोपचार उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. याद्वारे विविध २० प्रकारच्या उपचार पद्धतींचा वापर केला जाणार आहे.
महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र उपचार व्यवस्था, रुग्णांचे अभ्यासपूर्ण समुपदेशन, अनुभवी रोगोपचारतज्ज्ञ, निवास व्यवस्था, ग्रंथालय, स्वतंत्र योग व शटक्रियाकक्ष, दृकश्राव्य कक्ष, आरोग्यविषयक व्याख्याने, वॉकिंग ट्रॅक, नैसर्गिक औषधे, ध्यानधारणा प्रशिक्षण आदी सुविधा या केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. पाठदुखी, गुडघेदुखी, मानदुखी यासारख्या सामान्य आजारांपासून ते श्वसनविकार, मानसिक ताण तणाव, हृदयरोग, अर्धांगवायू यासारख्या व्याधींवर या योग आणि निसर्गोपचार केंद्रात प्रभावी उपचार उपलब्ध होणार आहेत. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शि. प्र. संस्थेचे अध्यक्ष बिहारीलाल डंग, खजिनदार प्रकाश बर्डे, सचिव डॉ. अनिल राठी, जनरल सेक्रेटरी नारायण कलंत्री आदींसह संस्थेच्या संचालक मंडळाने केले आहे.