Breaking News

महिलादिनानिमित्त 'महिला मतदार नोंदणी'साठी विविध कार्यक्रमांचे आयोजन

अहमदनगर ;- लोकशाही प्रक्रियेमध्ये महिलांचा अधिकाधिक सहभाग असावा आणि त्या माध्यमातून जनजागृती व्हावी यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासंदर्भात नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात यासंदर्भात जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी बैठक घेऊन महिला दिनानिमित्त आयोजित करावयाच्या विविध कार्यक्रमांबाबत आढावा घेतला. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार (निवडणूक) सुधीर पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महिला दिनाचा मुख्य कार्यक्रम माऊली सभागृहात दिनांक 8 मार्च रोजी सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी, वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. तत्पूर्वी सकाळी 8 वाजता रॅली काढण्यात येणार असून यात छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना, नर्सिंग महाविद्यालयासह इतर महाविद्यालयीन युवतींचा सहभाग असणार आहे.