Breaking News

जामखेडला शिवसेनेचा रस्तारोको आंदोलन

जामखेड येथे हमी भावाने हरबारा केंद्र सुरू करावे. त्याचबरोबर जामखेडच्या तहसील कार्यालयात तहसीलदार, पोलिस स्टेशनमध्ये पोलिस निरीक्षक, पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी, जि. प. बांधकाम विभागामध्ये उपअभियंता, ग्रामीण रूग्णालयामध्ये वैद्यकीय अधिक्षक आदी महत्त्वाच्या कार्यालयामध्ये प्रमुख पदावर अधिकारी नसल्याने तालुक्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात कुचंबणा होऊन असुविधेचा सामना करावा लागत आहे. कायमस्वरूपी अधिकारी नसल्यामुळे कुठलेही शासकीय कामकाज वेळेवर होत नाही. त्यामुळे वरील विभागात प्रमुख पदावरील अधिकार्‍याची नेमणूक करण्यात यावी अन्यथा जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीने दि. 3 एप्रिल रोजी जामखेड येथील खर्डा चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्याचे आयोजन करण्यात येणार आहे. 

जामखेड तालुक्यामध्ये यंदा पाऊस अधिक प्रमाणात झाल्याने शेतकर्‍यांनी अधिक प्रमाणात खरिपातील तूर, उडीद तसेच रब्बी हंगामामध्ये हरबार्‍याचे नगदी पिक मोठ्या प्रमाणात घेतले आहे. शेतकर्‍यांना हमी भाव मिळावा म्हणून शासनाने चालू वर्षापासून हरभरा केंद्र सुरू केले आहे. हे करत असताना जामखेड हे तालुक्याचे ठिकाण असून दळनवळनासाठी योग्य ठिकाण असल्याने हरभरा केंद्र येथेच सुरू करणे आवश्यक असताना राजकीय कार्यकर्त्यांची मर्जी राखण्यासाठी हे खरेदी केंद्र जाणीवपूर्वक खर्डा येथे सुरू करण्यात आले. यापुर्वी उडीद, तूर, खरेदी जामखेड व खर्डा येथे चालू करण्यात आले होते. त्याच धर्तीवर जामखेड येथेही सुरू करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात येत आहे. 
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्यकार्यकारी अधिकारी, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, तहसीलदार जामखेड, पोलीस निरीक्षक जामखेड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जामखेड शहराचा वाढता विस्तार, तसेच जामखेड तालुका मराठवाड्याच्या सरहद्दीवर असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. याच कारणामुळे शहरातील जागेचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणूस व्यवसायासाठी जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे सुशिक्षित बेकार तरूणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे येथे रस्तालगत अनेक शासकीय मालकीच्या जागेमध्ये हे सुशिक्षित तरूण व्यवसाय करत होते. परंतू प्रशासनाने अतिक्रमणच्या नावाखाली शहरातील काही भागातील अतिक्रमण काढलेली आहेत. त्यामुळे हे तरूण रस्त्यावर आले आहेत. या गोष्टीचा विचार करता शासनाच्या मालकीच्या नवीन बसस्थानक परिसर, जुने बस्थानक परिसर, खर्डा चौक, येथील जिल्हा परिषदच्या या जागेमध्ये शॉपिंग सेंटर उभारून सुशिक्षित बेकार तरूणांचे पूर्नवसन करण्यात यावे असे या निवेदनात म्हटले आहे. 
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यामध्ये नावाजलेली आहे. मराठवाड्याच्या सरहद्दीवर असल्याने परिसरातील शेतकरी आपल्या शेतीतील माल व जनावरे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात याठिकाणी घेवून येतात, या ठिकाणी जनावरांच्या बाजारासाठी जागा कमी पडत असताना संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी स्वतःची घरे भरण्यासाठी संस्थेची जागा शेतकर्‍यांना देण्याऐवजी या जागेमध्ये प्लॉट पाडून हे भूखंड संचालकांनी स्वतःच्या मर्जीतील लोकांना दिले आहेत. जे अनेक वर्षांपासून या ठिकाणी व्यवसाय करतात त्यांना न देता हे भूखंड अनधिकृतपणे वाटप करण्यात आले आहे. यांची सविस्तर चौकशी करून हे सर्व दिलेले भुखंडाचे व्यवहार रद्द करावेत व पुन्हा नियमाप्रमाणे निविदा काढून जाहीरपणे भूखंडाचे वाटप करण्यात यावे, तसेच यामध्ये दोषींवर कारवाई करण्यात यावी असेही निवेदनात म्हटले आहे.
तालुक्यात यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे त्या प्रमाणात पाण्याचा श्रोत वाढला आहे. हे असताना सतत खंडीत होणारा विज पुरवठा व कमी दाबाने मिळणारा विज पुरवठा यामुळे शेतकर्‍याची पिके पाणी असताना विज पुरवठ्याअभावी जळून गेली आहेत. याचा विचार करता सततचे होणारे भारनियमन कमी करण्यात यावे. तसेच वसूलीच्या नावाखाली विज वितरण कंपनीकडून टॉन्सफामर्स बंद करू नये. अशा प्रकारच्या मागण्या निवेदनामध्ये करण्यात आल्या आहेत. या मागण्यांचा विचार न केल्यास दि. 3 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजता जामखेड खर्डा चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून, या होणार्‍या रस्ता रोको आंदोलनात काही अनुचित प्रकार घडल्यास, या प्रकारास प्रशासन जबाबदार राहिल, असा इशाराच शिवसेना तालुकाप्रमुख शहाजी राजेभोसले, शहरप्रमुख संजय काशीद, शिवसेना नेते अंकुश उगले, शिवसेना नेते लक्ष्मण कानडे, ता. उपप्रमुख संतोष वाळूंजकर, मोहन जाधव, बब्रुवान वाळुंजकर, राजू पाचारे, युवा सेना ता. उपप्रमुख संदीप भोरे, हर्षद मुळे, दत्ता शिंदे, कैलास जाधव, भागीनाथ उगले, बाळासाहेब काकडे, अजिनाथ कुमटकर, प्रवीण पोते, भरत मोहळकर, आप्पा मोहळकर, छबू कोरडे, दत्ता गोरे, देवीदास पवार, पप्पू गर्जे यांनी दिला आहे.