Breaking News

अनाथ निराधारांसाठी अग्निपंख फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद

तालुक्यातील ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृहातील अनाथ, निराधार, लोक कलावंत, ऊस तोड मजूर, वीट भट्टी कामगार, भटके विमुक्त, आदिवासी, वंचित दुर्लक्षित घटकातील गोरगरिब कुटूंबातील मुलांच्या जेवणासाठी श्रीगोंदा येथील अग्निपंख फाऊंडेशनच्या वतीने तालुक्यातील सर्व विद्यालयात अनाथ निराधारांसाठी एक मुठ धान्य असा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून तालुक्यातील सर्व विद्यालयात मिळून 10 टन ज्वारी, गहू, बाजरी व तांदूळ अशा स्वरूपाचे धान्य गोळा करून महाराष्ट्रात विविध ठिकाणी सुरु असलेल्या अनाथ निराधार मुलांच्या बालगृहासाठी, वृद्धाश्रमाला, अनाथालयाला पोहोच करून विद्यार्थ्यांना देखील समाजकार्य कशा पद्धतीने करता येऊ शकते, याचा प्रत्यय प्रत्यक्षात अंमलबजावणी करून दाखविला. जामखेड येथील ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृहातील विद्यार्थ्यांसाठी 10 क्विंटल धान्य देऊन अनाथ, निराधार, लोक कलावंत, ऊस तोड मजूर, वीट भट्टी कामगार, आदिवासी, भटके विमुक्त, वंचित व दुर्लक्षित घटकातील गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लावला. 

निवारा बालगृहाला जामखेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नितीन पगार यांच्याहस्ते 10 क्विंटल धान्य देण्यात आले, यावेळी साहेबांनी बोलताना अग्निपंख फाऊंडेशनचे सचिव बाळासाहेब काकडे यांच्या पुढाकाराने सुरू केलेल्या अनाथ निराधारांसाठी एक मुठ धान्य उपक्रमाचे कौतुक करत समाजातील प्रत्येक नागरिकांना सामाजिक क्षेत्राची आवड निर्माण झाली पाहिजे. तसेच ती सक्षमपणे निभावली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. हा उपक्रम निश्‍चितच अनाथ निराधारांच्या चेहर्‍यावर आनंद निर्माण करील असे मत व्यक्त करून अग्निपंख फाऊंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे संस्थापक डॉ. अरुण जाधव, अशोक निमोणकर, खांडवी गावचे सरपंच नरेंद्र जाधव, नगरसेवक अमित जाधव, शिवराणा ग्रुपचे अध्यक्ष धनराज पवार, विशाल जाधव, लोक अधिकार आंदोलनाच्या महिला जिल्हाध्यक्षा द्वारका पवार, निवारा बालगृहाचे अधिक्षक संतोष गर्जे, शिक्षक बाबासाहेब डोंगरे, हनुमंत भोसले, जाकीर तांबोळी आदींसह बालगृहातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.