Breaking News

खडसेंची बदनामी करण्याची धमकी देत खंडणी मागणारा नगरसेवक जाळ्यात

जळगाव, दि. 12, मार्च - जळगाव जिल्ह्यातील यावलचे नगरसेवक अतुल पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या परिवाराची बदनामी करण्याची क्लीप प्रसारीत करण्याची धमकी देत 50 हजारांची खंडणी मागणा-या यावलमधील नगरसेवक सुधाकर आनंदा धनगर यांच्या यावल पोलिसांनी औरंगाबादमधून मुसक्या आवळल्या. या प्रकरणी नगरसेवक अतुल वसंतराव पाटील यांनी आरोपीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.8 मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता यावल शहरातील हॉटेल पूर्णब्रह्मा समोर फिर्यादीच्या मोबाईलवर आरोपीने फिर्यादी व माजी मंत्री एकनाथराव खडसे त्यांच्या कुटुंबियांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरून रेकॉर्डींग क्लीप तयार करीत 50 हजारांची मागणी केली होती. तर त्यांनी फिर्यादीने आरोपीस दहा हजार रुपये दिले होते. तसेच आरोपीने पुन्हा आठ ते दहा दिवसात उर्वरीत 40 हजारांची रक्कम न दिल्यास हात-पाय तोडून टाकण्याची धमकी देत रेकॉर्डींग क्लीप प्रसिद्धीस देईल, अशी धमकी दिली होती. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी औरंगाबादकडे पसार झाल्यानंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी व सहका-यांनी त्याच्या रविवारी पहाटे मुसक्या आवळल्या.