Breaking News

अग्रलेख - हरवत चाललेले सामाजिक भाष्य !

सर्वसामान्य माणूस हा मनोरंजन करणार्‍या साधनांच्या माध्यमांतून काही संदेशही घेत असतो. त्याच्या पर्यंत हा संदेश सामाजिक आशयाच्या अनुषंगाने पोहोचवायचा असेल तर विषयांमधील वैज्ञानिकता अत्यंत काटेकोरपणे जोपासने आवश्यक आहे. भारतात विषयांची प्रचंड विपुलता आहे. मात्र त्या विषयांकडे डोळसपणे पहाण्याचे दृष्टीकोन मात्र विकसित करावे लागतील. अशा प्रकारचे दृष्टीकोन हे कुठल्याही प्रशिक्षणातून तयार केले जात नाहीत, तर त्यासाठी प्रबोधनाची चळवळ सातत्याने चालवावी लागते. चित्रपटांसारखे मनोरंजनाचे क्षेत्र जनतेकडून केवळ पैसा काढून घेण्याचा दृष्टीकोन ठेवतो. मात्र समाजातील विविध प्रश्‍नांवर विज्ञानवादी भाष्य करण्यासाठी ते मात्र कच खातात. भारतीय चित्रपट सृष्टी अनेक विषय हाताळत असली तरी, व्यावसायिक चित्रपटांतून कोणत्याही विषयाला उथळपणे हाताळले जाते. जे सामान्य माणसाला पटण्यापलिकडे असते. कलात्मक चित्रपटात विषय क्लिष्ट करुन मांडले जातात. त्यामुळे ते सामान्य माणसाला समजत नाहीत. आणि म्हणून असे चित्रपट चित्रपटगृहांमध्ये फार काळ स्थिरावत नाहीत. यावरुन कलात्मक चित्रपट क्षेत्रातील मंडळी अशा प्रकारचे चित्रपट चालत नसल्याचा निष्कर्ष काढून मोकळे होतात. काही वर्षांपूर्वी शोमॅन असलेल्या राज कपूर यांनी काही सामाजिक विषयांचे चित्रपट व्यावसायिक पध्दतीने निर्माण केले. पण त्यांचा ‘जागते रहो’ हा चित्रपट सोडला तर, कोणत्याही चित्रपटात विषयाचे फारसे गांभिर्य आले नाही. भारतात सर्वोत्तम म्हटला जाणारा ‘मदर इंडिया’ हा चित्रपट शेतकर्यांच्या जीवनावर आधारलेला असला तरी, त्यातील पुरुष शेतकरी कचखाऊ दाखविला आहे. त्यामुळे भारतीय शेतकर्यांवर तो एक प्रकारचा अन्याय आहे. हा चित्रपट स्त्रीप्रधान होता. भारतीय शेतीत आजही स्त्रीयांचे श्रम प्रधान आहे. शेतातील अनेक कामांमध्ये भारतीय स्त्री शेतकरी आणि शेतमजूर म्हणून काम करते. त्याचे रेखाटनही या चित्रपटात व्यवस्थित मांडले गेले नाही. अलिकडच्या काळात शेतकर्यांच्या आत्महत्यांवर आधारलेला चित्रपट निर्माण केला. पण तो वास्तवाला भिडला नाही. त्यामुळे भारतीय चित्रपट सृष्टी प्रचंड अर्थाजन मिळवून देणारी असतांनाही त्यातील विषय मनोरंजक पध्दतीने मांडले जात नाहीत. महाराष्ट्रातील लोककला म्हणून प्रसिध्द असलेला तमाशा कितीही गंभीर विषयाला मनोरंजनाच्या माध्यमातून ज्या पध्दतीने मांडतो ती पध्दत आजही अती श्रीमंत असणार्या चित्रपटसृष्टीला साध्य करता आली नाही. महाराष्ट्राचा वग सम्राट समजला जाणारा आणि राष्ट्रपती पारितोषिक विजेता कलाकार दादू इंदूरीकर यांनी गाढवाचे लग्न या वगातून जे सामाजिक भाष्य केले आहे, ते आजपर्यंत कोणत्याही चित्रपटांतून व्यक्त करता आले नाही. मराठी चित्रपट सृष्टीतला यशस्वी सम्राट समजले जाणारे दादा कोंडके यांची कला ही या दादू इंदूरीकरांची नक्कल होती. मात्र आजही या अस्सल कलाकाराची ओढ ना मराठी चित्रपट सृष्टीला राहीली ना हिंदी चित्रपट सृष्टी त्या प्रयोगासाठी पुढे आली. या वैविधतेला समजून घेण्याची गरज असून यासाठी कलाक्षेत्रातील लेखक-दिग्दर्शक-गीतकार या सगळ्यांनाच समाजातील अभावांचे व्यंगात्मक मांडणी जमली पाहिजे आणि ती तितक्याच ताकदीने सादर करता आली पाहिजे. हे मनोरंजनाच्या कलाक्षेत्राचे मर्म आहे. हे मर्म न जाणताच तयार केली जाणारी कलाकृती ही जनमनाचा फारसा ठाव घेवू शकत नाही. कला-साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात वैज्ञानिक आधार निर्माण करण्याची गरज आहेे. अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारे चित्रपट आणि नाट्य ही क्षेत्रे देखिल यास अपवाद नसल्याचे ते म्हणतात. तांत्रिकदृष्ट्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन चित्रपट निर्मिती केली जाते. चित्रपटाच्या भव्य-दिव्यतेसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पण यातील विषय आणि आशय मात्र आजही अंधश्रध्दांना खतपाणी घालतील अशाच प्रकारचे असतात, ही खंतही त्यांनी व्यक्त केली.